लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. पवना धरण 100 टक्के भरले असल्याने या धरणामधून आज सकाळी सहा वाजता वीज निर्मिती केंद्रासाठी 1400 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, पाण्याची आवक लक्षात घेता यामध्ये वाढ करत धरणाच्या सांडव्यातून सकाळी 8 वाजता 2100 क्युसेक्सने वाढ करत एकूण 3500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सकाळी 11 नंतर पावसाचा जोर वाढल्याने विसर्गात वाढ करत दुपारी दोन वाजता एकूण विसर्ग 5600 क्युसेक्स करण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. धरणाचे सर्व 6 दरवाजे उघडून त्यामधून हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे.
पवना नदीला पूर आला असून, पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घेत पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.








