व्हिडिओच्या माध्यमातून कुटुंबीयांना दिली माहिती
बेळगाव : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी चेंगराचेंगरीत बेळगाव शहरातील चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या भाविकांची काळजी लागली असून त्यामुळे त्यांनी आपण सुखरुप असल्याचे सांगत कुटुंबीयांना व्हिडिओ पाठविला आहे. साईरथ ट्रॅव्हल्सच्या बसमधून गेलेले 60 पैकी 56 जण सुखरुप असल्याचे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. सुमारे 22 ते 25 कि. मी. दूरवर खासगी बस उभी करण्यात आली होती. तेथून सर्व 60 भाविक पायी चालत पुण्यस्नानासाठी आले होते. यापैकी चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. बेनकनहळ्ळी, बेळगाव शहर परिसरातील हे सर्व भाविक आहेत. मदन पाटील, अश्विनी नाकाडी, शोभा घोरपडे आदींनी आपण सुखरुप असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
चेंगराचेंगरीपूर्वी काय घडले, याची माहिती बेळगावमधील भाविकांनी दिली असून खासगी बसेस सुमारे 22 ते 25 कि. मी. अंतरावर उभी करून पायी चालत व रिक्षाने हे सर्वजण ब्रह्म मुहूर्तावरील पुण्यस्नानासाठी संगमावर पोहोचले होते. मंगळवारी हे सर्वजण पुण्यस्नानासाठी गेले होते. बुधवारी दुपारपर्यंत स्नान आटोपून त्यांना बसेस उभी केलेल्या ठिकाणी पोहोचायचे होते. त्याआधीच झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ते सर्वजण विखुरले गेले. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महादेवी बावनूर या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा होत्या. अरुण कोपर्डे यांची पत्नी भाजप महिला मोर्चाच्या सेक्रेटरी आहेत. अरुण यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरित सर्व 56 भाविक बुधवारी सायंकाळी बसपर्यंत पोहोचले आहेत. गर्दीमुळे त्यांना तेथून बस बाहेर काढता येईना, अशी स्थिती आहे. गर्दी ओसरल्यानंतर आम्ही येथून सुटणार आहोत, असे भाविकांनी सांगितले.









