अर्ज मागे घेण्यासाठी आज मुदत
डिचोली : सांखळी नगरपालिका निवडणुकीसाठी भरण्यात आलेले सर्व उमेदवारी अर्जांची छाननी काल बुधवारी दि. 19 एप्रिल रोजी डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात पूर्ण झाली. छाननीत सर्व अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. केवळ प्रभाग क्र. 8 मध्ये माजी नगरसेवक रियाझ खान यांनी भरलेल्या दोन पैकी एक अर्ज आपोआप बाद झाला आहे. त्यामुळे केवळ एक अर्ज वगळता इतर 56 अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत. आज गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून संध्याकाळी सांखळी नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. संध्याकाळीच उपजिल्हाधिकारी कार्यालयात सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हे बहाल करण्यात येणार आहेत.डिचोली उपजिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी रोहन कासकर, उपनिवडणूक अधिकारी तथा मामलेदार राजाराम परब तसेच या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले गोवा राज्य एससी व ओबीसी अर्थ विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद वळवईकर यांच्या उपस्थितीत डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात या अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी उमेदवारही उपस्थित होते. मामलेदार राजाराम परब व उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले.
मतमोजणी होणार साखळीतच
डिचोली तालुक्यातील यापूर्वी घेण्यात आलेल्या सर्व निवडणुकांची मतमोजणी ही पूर्वी वाठादेव सर्वण येथील नारायण झांट्यो स्मृती क्रीडा प्रकल्प सभागृहात होत होती. परंतु यावेळी निवडणूक आयोगाने त्यात बदल घडवत सांखळीच्या नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी साखळीतील मल्टिपर्पज सभागृहात ठेवली आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया याच सभागृहातूनच होणार आहे., असे यावेळी मामलेदार राजाराम परब यांनी सांगितले.
प्रभागनिहाय उमदेवारी अर्ज पुढील प्रमाणे :
प्रभाग क्र. 1 मध्ये 8, प्रभाग क्र. 2 मध्ये 8, प्रभाग क्र. 3 मध्ये 2, प्रभाग क्र. 4 मध्ये 6, प्रभाग क्र. 5 मध्ये 4, प्रभाग क्र. 6 मध्ये 6, प्रभाग क्र. 7 मध्ये 5, प्रभाग क्र. 8 मध्ये 7, प्रभाग क्र. 9 मध्ये 3, प्रभाग क्र. 10 मध्ये 3, प्रभाग क्र. 11 मध्ये 2, प्रभाग क्र. 12 मध्ये 3 अशा उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत. सर्वाधिक उमेदवारी अर्ज प्रभाग क्र. 1 व 2 मध्ये दाखल झालेले आहे.









