बेळगाव : आक्रमक खेळ व उत्कृष्ट बचावफळीच्या जोरावर सेंट पॉल्स संघाने बलाढ्या लव्हडेल संघाचा सडन डेथमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव करुन 55 वा फादर एडी चषक पटकाविला. सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 55 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे उद्घाटन उत्तरचे आमदार राजू शेठ, प्राचार्य सॅव्हिओ अॅब्रू आदी मान्यवरांच्या हस्ते सेंट पॉल्स व लव्हडेल संघांच्या खेळाडूंची ओळख करुन अंतिम सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. लव्हडेल संघाने बीडीएफए चषकावर आपले नाव कोरले होते. या संघात आक्रमक खेळाडू असल्याने हा सामना एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण सेंट पॉल्स संघाने पहिल्या मिनिटापासून आपली रणनिती आखून लव्हडेलच्या सर्व चढाया परतवल्या. चौथ्या मिनिटाला राहूल सिंगने मारलेला वेगवान फटका सेंट पॉल्सचा गोलरक्षक उझेर पठानने उत्कृष्ट अडविला. 12 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या जोस्वा वॉझने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. 22 व्या मिनिटाला लव्हडेलच्या यूनस खानच्या पासवर डेनी मीतेईने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 28 व्या मिनिटाला शिनन कोलकारने डी बाहेरुन वेगवान फटका सेंट पॉल्सच्या गोलपोस्टमध्ये मारला होता. पण सेंट पॉल्सच्या गोलरक्षकाने तो चेंडू आपल्या डावीकडे झेपावत तो बाहेर काढला. पहिल्या सत्रात लव्हडेलने 1-0 ची आघाडी मिळविली.
दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांच्या बचावफळीने ते प्रयत्न हाणून पाडले. खेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना शिनन कोलकारच्या पासवर जोस्वा वॉझने गोल करुन 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर पंचांनी जादा वेळ नियमाचा वापर केला. त्यामध्येही दोन्ही संघ समान राहिल्याने पंच अमिन पिरजादे यांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांचा गोलफलक 4-4 असा राहिला. सेंट पॉल्सतर्फे आरुष केसरकर, बिलान, ओमानउल्ला आशेखान, जोस्वा वॉझ यांनी गोल केले. तर प्रणव शहापूरकरने चेंडू बाहेर मारला. लव्हडेलतर्फे राहूल पाटील, युनस खान, विनस निंगथौजम, बिकास मीतेई यांनी गोल केले. तर सिद्धार्थ सिंगने चेंडू बाहेर मारला. त्यानंतर सडन डेथ नियमाचा वापर केला. त्यात सेंट पॉल्सच्या मॅरिओ फ्राँसिसने गोल केला. तर रोहित सिंगने चेंडू बाहेर मारला. या सामन्यात सेंट पॉल्सने सडन डेथमध्ये 6-5 असा विजय संपादन केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे आमदार राजू शेठ यांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स संघाला फिरता चषक व कायमस्वरुपी चषक तर लव्हडेल संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू बिकास मीतेई, उत्कृष्ट गोलरक्षक उझेर पठाण, उगवता खेळाडू गौरांग उच्चूकर (झेवियर्स), उत्कृष्ट संघ संत मीरा अशी वैयक्तिक बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून अमिन पिरजादे, अभिषेक चेरेकर, बांदेकर, इब्रान बेपारी, रॉयस्टीन गोम्स व विष्णू दावणेकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सेंट पॉल्स पोलाईट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









