वृत्तसंस्था/ मोरेह
म्यानमारमध्ये सैन्य आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मिझोराममध्ये घुसलेले 29 म्यानमार सैनिक अजूनही भारतीय सुरक्षा दलांच्या ताब्यात आहेत. खराब हवामानामुळे त्यांना हेलिकॉप्टरने म्यानमारला पोहोचवता आले नाही. मात्र, गेल्या 24 तासात मिझोरमच्या अधिकाऱ्यांनी म्यानमारमधील सुमारे 550 नागरिकांना परत पाठवले आहे. पाच हजारांहून अधिक म्यानमार अजूनही चंफई जिल्ह्यातील गावांमध्ये आहेत. म्यानमारमध्ये जुंटाचे सैन्य आणि सशस्त्र बंडखोर यांच्यातील संघर्षादरम्यान झालेल्या हवाई हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आता तेथील देखरेख वाढविली आहे.
गृहयुद्धाला तोंड देत असलेल्या म्यानमारमधील शेकडो बंडखोर मागील चार दिवसांमध्ये मिझोरममध्ये घुसले होते. म्यानमारचा सीमावर्ती प्रांत चिनमध्ये सैन्याने बंडखोरांवर हवाई हल्ले करत त्यांना भारतीय सीमेत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय गावांमध्ये या लोकांनी आश्रय घेतला होता. सर्वसामान्य लोकांसोबत म्यानमारचे 43 सैनिकही भारतीय हद्दीत दाखल झाले होते. म्यानमारच्या घुसखोरांमध्ये काही जण जखमी असून यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली.









