पुरवठ्याच्या तुलनेत वितरण अधिक
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मार्च महिन्यापासून प्रति माणसी 15 किलो तांदळाचे वितरण केले जात असल्याने दुकानदारांकडे उपलब्ध तांदळाचा साठा संपला आहे. त्यामुळे दुकानदार तांदळाच्या प्रतीक्षेत असून, रेशन कार्डधारकांना तांदळाचा स्टॉक नसल्याचे सांगितले जात आहे. गोडावूनमध्येच तांदळाचा साठा नसल्याने अद्याप तांदूळ पुरविण्यात आला नाही. त्यामुळे 55 टक्के रेशन कार्डधारक तांदळाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी रेशन कार्डधारकांना प्रति माणसी 10 किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. तांदूळ पुरविण्याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने तांदूळ पुरविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे राज्य सरकारने 5 किलो तांदळाचे वितरण करून उर्वरित 5 किलो तांदळाच्या मोबदल्यात कार्डधारकांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा केले जात होते. पण पैशाऐवजी लाभार्थ्यांना 10 किलो तांदूळच देण्यात यावा यासाठी राज्य रेशन दुकानदार असोसिएशनकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात होता.
त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच. मुनियप्पा यांनी फेब्रुवारी महिन्यापासून प्रति माणसी 10 किलो तांदूळ देण्याचे जाहीर केले होते. पण, फेब्रुवारी महिन्यात बहुतांश रेशन दुकानदारांनी आधीच तांदळाची उचल केल्याने त्या तांदळाचे वाटप होऊ शकले नव्हते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा उर्वरित 5 किलो आणि मार्च महिन्यातील 10 किलो असा एकूण प्रति माणसी 15 किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार मार्च महिन्यात रेशन दुकानदारांकडून माणसी 15 किलो तांदूळ वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली.
गोडावूनमध्येच तांदूळ नसल्याने रेशन दुकानदारांची गोची
मात्र पुरवठ्यापेक्षा तांदळाचे वितरण अधिक झाल्याने दुकानदाराकडील उपलब्ध साठा खाली झाला आहे. केवळ 45 टक्के कार्डधारकांना तांदूळ मिळाला असून 55 टक्के कार्डधारक तांदळापासून वंचित आहेत. तांदूळ पुरवठा करण्याबाबत रेशन दुकानदारांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र गोडावूनमध्येच तांदूळ नसल्याने रेशन दुकानदारांची गोची झाली आहे. तांदळाची वाहतूक होत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तांदळाची वाहतूक सुरू झाल्यानंतर उर्वरित रेशन कार्डधारकांना तांदूळ मिळेल. मात्र तोपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी रेशन दुकान मालक संघटचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी केले आहे









