निफ्टीत 182 अंकांची वाढ ः टाटा, महिंद्राचे समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी महिन्यातील पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार दमदार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. ऑटो क्षेत्रातील टाटा मोटर्स, महिंद्रा यांच्या कामगिरीच्या जोरावर व जागतिक मिळत्या जुळत्या परिस्थितीचा आधार घेत सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक तेजीत राहिले होते.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 545 अंकांच्या वाढीसह म्हणजेच 0.95 टक्के वाढीसह 58,116 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 182 अंकांच्या वाढीसह किंवा 1 टक्के वाढीसह 17,340 अंकांवर पोहचल्याचे पाहायला मिळाले. भारतीय शेअर बाजाराची महिन्याची सुरुवात चांगली झाली. पुढे बाजार कशी दिशा घेतो हे पाहावे लागेल. ऑटो, धातू, वित्त क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदीचा कल राहिला तर रिलायन्स इंडस्ट्रिजनेही बाजाराला मजबूत आधार दिला. दरम्यान ऑटो क्षेत्रातील महिंदा आणि महिंद्राचे समभाग 6 टक्के वाढीसह दमदार कामगिरी करत आघाडीवर राहिले होते. रिलायन्स, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, एनटीपीसी, एसबीआय, ऍक्सिस बँक व टायटन यांचे समभाग तेजी राखून होते. तर सन फार्मा, एचयुएल, नेस्ले, टीसीएस, एचडीएफसी आणि एशियन पेंट्स यांचे समभाग मात्र घसरणीत होते. ऑटो निर्देशांक 3 टक्के, धातु निर्देशांक 1.5 टक्के वधारलेला पाहायला मिळाला. बीएसईवरील जवळपास 133 समभाग हे 52 आठवडय़ाचा उच्चांकी भाव राखून होते. जागतिक बाजारांचा विचार करता अमेरिकेतील व युरोपियन बाजार हे काहीसे तेजी राखून व्यवहार करत होते. तर आशियाई बाजारात निक्की 191 अंकांनी, हँगसेंग 9, कोस्पी 0.75 आणि शांघाई कम्पोझीट 6 अंकांनी तेजीत होता. अमेरिकेतील डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैसे वधारला होता. रुपया डॉलरच्या तुलनेत 79.02 वर व्यवहार करत होता









