बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दहावी परीक्षेला सुरळीत प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरळीत प्रारंभ झाला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालक व विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर गर्दी झाली होती. प्रथम भाषा पेपर असल्यामुळे विद्यार्थी काहीसे रिलॅक्स होते. कॉपीला आळा बसावा यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती.
शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असल्याने मागील महिन्याभरापासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती. अनेक विद्यार्थ्यांचे क्रमांक इतर शाळांमध्ये आल्याने गुरुवारी सायंकाळी तसेच शुक्रवारी सकाळी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर हजर राहून आपले क्रमांक तपासात होते. परीक्षा केंद्रावर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने सर्व परीक्षा केंद्रांवर पाहणी करून सोयी उपलब्ध केल्या आहेत. कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात ही भरारी पथके प्रत्येक परीक्षा केंद्रांवर जाऊन तपासणी करत होती. संशयित विद्यार्थी आढळल्यास त्याची पूर्ण चौकशी केली जात होती. याचबरोबर सीसीटीव्हीची नजरही ठेवण्यात आली आहे.
डिजिटल वॉचवर कारवाई
सध्या सर्रास विद्यार्थ्यांकडे डिजिटल स्मार्टवॉच आहेत. शिक्षण विभागाने यापूर्वीच प्रत्येक शाळांना सूचना करून डिजिटल वॉच वापरावर बंदी असल्याचे सांगितले होते. तरीदेखील काही परीक्षा केंद्रांवर डिजिटल वॉच घेऊन विद्यार्थी दाखल होत होते. अशा विद्यार्थ्यांना थांबवून त्यांच्याकडून डिजिटल वॉच काढून घेण्यात आले. नव्या डिजिटल वॉचला ब्ल्यूटूथ सोबत कनेक्ट केल्यास त्याचा मोबाईलप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे खबरदारी घेत डिजिटल वॉचवर कारवाई करण्यात आली.
31 हजार 810 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित
प्रथम भाषा पेपरसाठी एकूण 32 हजार 346 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 31 हजार 810 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पहिल्याच पेपरला 536 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दहावी हे आयुष्यातील सर्वात महत्वाचे शैक्षणिक वर्ष असताना काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे गांभीर्य नसल्याची बाब सामोरी आली आहे.