5 वर्षांच्या कालावधीतील आकडेवारी : 658 जणांनी केली आत्महत्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय पोलीस सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये मागील 5 वर्षांमध्ये 50 हजारांहून जवानांनी नोकरी सोडली आहे किंवा निवृत्ती पत्करली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सरकारने ही लेखी माहिती दिली आहे. मागील 5 वर्षांमध्ये निमलष्करी दलांच्या 53,336 जवानांनी नोकरी साडल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले आहे.
काँग्रेस खासदार माणिकम टागोर यांनी निमलष्करी दलांच्या 50 हजारांहून अधिक जवानांनी मागील 5 वर्षांमध्ये नोकरी सोडली आहे का असा प्रश्न विचारला होता. तसेच निमलष्करी दलातील जवानांच्या आत्महत्येसंबंधी माहिती त्यांनी विचारली होती.
2018 मध्ये निमलष्करी दलांच्या 9,228 जवानांना स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती तर 1,712 जवान निवृत्त झाले हेते. 2019 मध्ये 8,908 जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला तर 1,415 जवान निवृत्त झाले होते. 2020 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 6,891 आणि 10,762 जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग निवडला होता. सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये 11,211 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली होती तर 1,169 जवान निवृत्त झाले होते. अशाप्रकारे मागील 5 वर्षांमध्ये एकूण 47,000 जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडला तर 6,336 जवान निवृत्त झाले आहेत.
निमलष्करी दलांमध्ये मागील 5 वर्षांत 658 जवानांनी आत्महत्या केली आहे. यात 2018 साली 96 जवानांनी स्वत:चे आयुष्य संपविले होते. यातील 36 जवान सीआरपीएफचे, 32 बीएसएफ, 5 आयटीबीपी, 9 एसएसबी, 9 सीआयएसएफ आणि 5 जवान आसाम रायफल्सचे हेते. 2019 मध्ये 129 तर 2020 मध्ये 142 जवानांनी आत्महत्या केली होती. 2021 मध्ये हे प्रमाण 155 तर 2022 मध्ये 136 राहिले आहे. निमलष्करी दलांमधील कामाचे वातावरण सुधारण्यासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी सातत्याने पावले उचलली जात असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.









