सोलापूर विभागातून २५० जादा गाड्यांची सोय
सोलापूर :
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातून ५,३०० एसटी बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी सोलापूर विभागातून २५० अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक दरवर्षी आषाढी वारीमध्ये सहभागी होतात. यंदाही आषाढीवारीच्या निमित्ताने लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून जाणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या भाविकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील मुख्य बसस्थानकांतून जादा वाहतुकीची व्यवस्था केली आहे.
महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती
वारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट सवलती जाहीर केल्या आहेत.
-
महिलांना ५०% तिकीट सवलत
-
७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास
-
६५ वर्षांवरील नागरिकांसाठी अर्धे तिकीट
रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांची तिकीट सवलत बंद केल्यामुळे भाविक एसटी प्रवासालाच अधिक पसंती देत आहेत.
प्रमुख मार्ग आणि गाड्यांचे थांबे
-
चंद्रभागा बस स्थानक: पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा
-
भिमा बस स्थानक: सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ
-
विठ्ठल बस स्थानक: अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव
-
पांडुरंग बस स्थानक: कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगोला
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची सोय व्हावी यासाठी एसटीचे नियोजन करण्यात आले आहे. याची बैठक बुधवारी पंढरपूर येथे परिवहन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे. सोलापूर विभागातून २५० तर राज्यातून पाच हजार ३०० गाड्यांचे नियोजन असेल.
– अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर








