वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 11 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या गुन्हेगाराची दोषसिद्धी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. परंतु न्यायालयाने 53 वर्षीय इसमाला गुन्ह्यावेळी अल्पवयीन ठरविले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने इसमाला किशोर न्याय बोर्डासमोर (जेजेबी) हजर होण्याचा निर्देश दिला आहे. अशा स्थितीत गुन्हेगाराला 3 वर्षांसाठी विशेष गृहात पाठविले जाऊ शकते. 1993 साली अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपी इसमाला कलम 376 अंतर्गत बलात्कारासाठी दोषी ठरविले होते आणि 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय जुलै 2024 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. दोषीने त्यावेळी अल्पवयीन असल्याचा मुद्दा उपस्थित केला नव्हता, परंतु सर्वोच्च न्यायालयात दोषसिद्धी आणि शिक्षेच्या विरोधात दाद मागताना त्याने याचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सत्र न्यायाधीशांनी गुन्हा करताना तो अल्पवयीन होता असा निष्कर्ष काढला. 17 नोव्हेंबर 1988 रोजी गुन्ह्यावेळी आरोपीचे वय 16 वर्षे 2 महिने आणि 3 दिवस इतके होते असे आढळून आले.









