पोटनिवडणुकीत 53 टक्के मतदान : मतदारांचा निरुत्साह
वार्ताहर/सांबरा
सांबरा येथे वॉर्ड क्र. चारमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये मतदारांचा निरुत्साह दिसून आला. केवळ 53टक्के मतदान झाले असून मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. येथील वॉर्ड क्रमांक चारमधील ग्रा. पं. सदस्या पद्मश्री नागराज पुजारी यांनी सहा महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी प्रशासनाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. या एका जागेसाठी देवकी मल्लाप्पा शगनी व जयश्री पुंडलिक पुजारी यांच्यामध्ये थेट लढत झाली. दोन्हीही उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली असली तरी एका राष्ट्रीय पक्षांमधील दोन गटांमध्येच वर्चस्वासाठी ही निवडणूक झाल्याचे समजते. त्यामुळे निकालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. वास्तविक पाहता सध्याच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ केवळ सहा महिने शिल्लक असल्याने सदर निवडणूक बिनविरोध व्हावी अशी ग्रामस्थांची इच्छा होती. मात्र एका राष्ट्रीय पक्षामधील दोन गटांमध्ये उमेदवाराच्या बिनविरोध निवडीसाठी तडजोड न झाल्याने ग्रामस्थांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे.
मतदारांमध्ये निरुत्साह
गावातील मराठी प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रांमध्ये मतदान झाले. मात्र सकाळपासूनच मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे दिसून आले. दुपारी बारा वाजेपर्यंत 1139 पैकी केवळ 270 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. तर सायंकाळपर्यंत केवळ 604 जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमुळे व निवडणूक बिनविरोध न झाल्याने नाराज झालेल्या मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. बुधवार दि. 28 रोजी बेळगाव येथील तहसीलदार कार्यालयामध्ये निकाल लागेल.









