वृत्तसंस्था /मुंबई
गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये वाहन निर्मात्या कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर, एमजी मोटर्स आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या वाहन विक्रीत चांगली वाढ दर्शवली गेली आहे. यामध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्या वाहन विक्रीत सप्टेंबरमध्ये 53 टक्के वाढ झाली असून सदरच्या महिन्यामध्ये 23,590 वाहनांची विक्री करण्यात आली आहे. हीच विक्री मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 15378 इतकी होती. तर दुसरीकडे वाहन उद्योगातील आणखी एक कंपनी एमजी मोटर्स यांनी सप्टेंबर महिन्यात 5003 वाहनांची विक्री केली आहे. एमजी मोटर्सच्या विक्रीमध्ये 31 टक्के वाढ दिसली आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने 17 टक्के वाढीसह 75 हजार 604 वाहनांची विक्री गेल्या महिन्यात केली आहे. कंपनीच्या प्रवासी वाहनांची विक्री सप्टेंबरमध्ये 20 टक्के वाढीसह 41,267 इतकी राहिली आहे. जी मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 34 हजार 500 इतकी होती. कंपनीच्या स्पोर्टस युटिलीटी व्हेईकल अर्थात एसयूव्ही गटातील कार्सना मागणी ग्राहकांनी वाढीव नोंदवली आहे. येणाऱ्या उत्सवी काळामध्ये या गटातील वाहनांची मागणी अधिक राहणार असल्याचाही विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. मागणी जरी मजबूत असली तरी सेमी कंडक्टरचा व कच्च्या मालाचा पुरवठा हे घटक उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहेत. कंपनीने मागच्या महिन्यामध्ये 2419 वाहनांची निर्यात केली आहे. सप्टेंबर 2022 च्या तुलनेमध्ये निर्यात 5 टक्के कमी दिसली आहे.









