वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
उत्तर कोरियाला सिगारेट्सची विक्री केल्याप्रकरणी अमेरिकेने स्वतःचा मित्रदेश असलेल्या ब्रिटनमधील एका कंपनीला मोठा दंड ठोठावला आहे. अमेरिकेने जगातील सर्वात मोठय़ा टोबॅको कंपन्यांमध्ये सामील ब्रिटिश-अमेरिकन टोबॅको कंपनीला (बीएटी) 52 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बीएटीच्या एका सहाय्यकाने किम जोंग उन यांच्या देशाला सिगारेट विक्री केल्याची बाब मान्य केल्यावर अमेरिकेने ही कारवाई केली आहे. बीएटीने उत्तर कोरियाला सिगारेट पुरविण्यासाठी अनेक आर्थिक घोटाळे केले होते असा खुलासाही या सहाय्यकाने केला होता.
2007-17 दरम्यान बीएटीने सहाय्यक कंपन्यांद्वारे अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन करत उत्तर कोरियाला सुमारे 35 हजार कोटी रुपयांची तंबाखू उत्पादने विकली होती. याचप्रकरणी अमेरिकेने या कंपनीला हा मोठा दंड ठोठावला आहे. सिगारेट विक्रीत सामील उत्तर कोरियन बँकर सिम ह्योन-सोप, चिनी सहाय्यक किन गुओमिंग आणि हान लिनलिन यांच्या विरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु हे तिन्ही आरोपी फरार आहेत.
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग एन हा धूम्रपानाचा शौकीन आहे. 2019 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या एका परिषदेदरम्यान किम जोंग उन हे धूम्रपान करताना दिसून आले होते. मागील वर्षी अमेरिकेने उत्तर कोरियाला तंबाखू निर्यात करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत मांडला होता, परंतु उत्तर कोरियाचे मित्रदेश चीन आणि रशियाने यावर नकाराधिकार वापरल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. तंबाखूच्या व्यवसायातून उत्तर कोरियाचे सरकार मोठी कमाई करत असल्याचे मानले जाते.









