प्रतिनिधी / रत्नागिरी :
चालक-वाहकाला निलंबित केल्याच्या विरोधात कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीर कामबंद आंदोलन करणाऱया कर्मचाऱयांना एसटी प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. शहर बससेवेचे लाखो रूपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत 52 कर्मचाऱयांवर 8 दिवसाच्या पगार कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
चालक-वाहकाला निलंबन केल्याने एस. टी. कामगार संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी दुपारी अचानक शहर बस वाहतूक बंद केली. त्यामुळे हजारो विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. 150 हून अधिक शहर बसफेऱया बंद राहील्याने लाखो रूपयांचा फटका एस.टी. प्रशासनाला बसला. कोणतीही पूर्वकल्पना न देता हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन मागे घेण्यास सांगूनही रात्री उशिरापर्यंत सुरूच ठेवण्यात आले. प्रशासनाकडून शहर बससेवा त्वरित सुरू करावी, अन्यथा परिपत्रक क्र. 10/2005 नुसार 8 दिवसाचा पगार कपात करण्यात येईल, अशी नोटीस लावण्यात आली होती. या नोटीसलाही कामगारांनी प्रतिसाद दिला नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी-मजगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर बसस्टॉप येथे एसटीच्या चाकाखाली चिरडून तरूणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधित चालक-वाहकाला निलंबित केल्यामुळे एस्टी कामगार संघटनेने हे आंदोलन केले होते. या आंदोलनात ऑनडय़ुटी 52 कर्मचारी सहभागी होते. तर डय़ुटी संपलेले शेकडो चालक-वाहक आंदोलनात सहभागी होते. यातील ऑनडय़ुटी असणाऱया 52 कर्मचाऱयांचाच पगार कपात करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.