लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या मावळातील पवना धरणात 51 टक्के पाणीसाठा आहे. मागील सहा दिवसांत धरणातील पाणी साठय़ात तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. मावळ तालुक्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर डोंगर भागातून येणारे धबधबे आणि पाण्याच्या धारा यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने वाढू लागला आहे. पवना धरण 51 टक्के भरले ही नागरिकांसाठी आनंदाची बाब असून, किमान अर्ध्या वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटला असे नागरिक सांगत आहेत.
यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली तसेच पावसाला जोर भेटत नसल्याने धरणातील पाणी साठा कमी झाला होता. मात्र, मागील पाच ते सहा दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के पाणीसाठा कमी आहे. 2022 साली आजच्या दिवशी पवना धरणात 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता तर आज मितीला तो 51 टक्के आहे. पावसाचा जोर असाच काही दिवस सुरू राहिल्यास पुढील दोन चार दिवसांमध्ये धरणातील पाणी साठय़ामध्ये समाधानकारक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








