शित्तूर वारुण :
चांदोली धरणात सध्या 51.27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरण प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास अडीच टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात 15. 12 टीएमसी पाणीसाठा होता. धरणात रविवारी 17.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस अगदी उशिरा सुरू झाला तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी आहे. दरवर्षी धरण शंभर टक्के भरते. याही वर्षी धरण शंभर टक्के भरले होते. सध्या धरणात 17.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाची पाणीपातळी 607.05 मीटर इतकी आहे. धरणातून दर 21 दिवसांनी शेतीसाठी पाणी सोडले जाते. वीजनिर्मिती तसेच कालव्यामार्फत सध्या 1610 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच महिन्यात 7.32 टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला होता. म्हणजे महिन्याला साधारण दीड टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत 9.44 टीएमसी पाणीसाठा खर्च झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.
अवघ्या दोन महिन्यांत महिन्याला साधारण 4.72 टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे. मे महिन्याचे कडक ऊन लक्षात घेता या महिन्याच्या अखेरपर्यंत अगदी 5 टीएमसी पाणीसाठा खर्च झाला तरी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणात कमीत कमी 12.64 टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची कसलीही टंचाई भासणार नसल्याचे दिलासादायक चित्र आहे.
दरम्यान, यावर्षी धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पाणी टंचाईची झळ बसणार नाही. ऐन उन्हाळ्यातही आपली वारणा नदी कायम वाहती राहील, अशी माहिती पाटबंधारे खात्याचे वारण शाखा अभियंता गोरख पाटील यांनी दिली.