मध्यप्रदेशातील चोरटा गजाआड : हुक्केरी पोलिसांची कारवाई
वार्ताहर /हुक्केरी
पाच महिन्यांपूर्वी मुंबईहून हुबळीला खासगी बसमधून सोन्याचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाची नोंद संकेश्वर पोलिसात झाल्यानंतर पोलिसांनी तपास गतिमान केला होता. त्याला बुधवारी यश आले. आंतरराज्य चोरट्यांना जेरबंद करताना त्यांच्याकडून सुमारे 51 लाख रुपयांचे 925 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली आहे.
याबाबत डॉ. पाटील यांनी दिलेली अधिक माहिती अशी, 4 फेब्रुवारी रोजी एका खासगी बसमधून सोने व्यापारी मुंबईहून हुबळीकडे जात होता. त्यावेळी त्यांच्यासोबत सोन्याचे दागिने होते. बस संकेश्वरनजीक एका हॉटेलजवळ येताच नाष्टा करण्यासाठी थांबविण्यात आली होती. याचदरम्यान चोरट्यांनी सोन्याची बॅग लंपास केली होती. त्या प्रकाराची तक्रार सदर व्यापाऱ्याने संकेश्वर पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत हुक्केरीचे सीपीआय एम. एम. तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यात सदर पथकाने परिसरासह मध्यप्रदेशच्या घाट जिल्ह्यातील मुनावर गावातील नागरिकांकडे चौकशी सुरू ठेवली होती. अखेर तेथील विनोद विश्राम चव्हाण याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरलेले सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.
चव्हाण याला न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी अजून दोन चोरांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यांचा तपास लागल्यास जिल्ह्यात झालेल्या अनेक चोरींचा शोध लावण्यात मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे. सदर कारवाईत सीपीआय एम. एम. तहसीलदार, पीएसआय एस. एच. पवार, संकेश्वरचे पीएसआय नरसिंहराजू जे. टी., कर्मचारी ए. एस. सनदी, एएसआय जी. एस. कांबळे, एस. आर. रामदुर्ग, यु. वाय. अवभावी, ए. एल. नायक, राजू ममदापूर, बी. व्ही. हुलकुंड, एस. एम. करगुप्पी, एम. जी. दोडमलिक, बी. टी. पाटील, विनोद ठक्कन्नावर, सचिन पाटील आदींनी सहभाग घेतला.









