ऑनलाईन टीम / बारामती :
कृषीपंपाची वीजबिले भरण्यात नेहमीच आघाडीवर असलेल्या बारामती विभागाने महा कृषी ऊर्जा अभियानांतर्गत 20 कोटींची वसुली करत आघाडी मिळविली आहे. तसेच जमा झालेल्या कृषी आकिस्मिक निधीतून गावपातळीवर विजेची कामे करण्याचा मानही बारामती विभागाने मिळवला आहे. यातूनच मुरुम (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. 1) टेकवडे रोहित्राची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली असून, राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच काम आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे कृषी धोरण 2020 ‘महा कृषी ऊर्जा अभियान’ या नावाने राबविले जात आहे. या धोरणानुसार कृषीपंपाच्या थकबाकीचे पुनर्रगठण करुन मूळ थकबाकीवरचे दंड व्याज माफ केले आहे. शेतकऱ्यांना सुधारित थकबाकीच्या केवळ 50 टक्के रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचे जंगी स्वागत केले आहे. मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या नियोजनामुळे महावितरण प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. परिणामी बारामती परिमंडलातील 54 हजार 584 ग्राहकांनी 89.21 कोटींचा भरणा केला आहे. परिमंडलात बारामती विभाग आघाडीवर असून विभागातील 15 हजार 563 कर्मचाऱ्यांनी 19 कोटी 42 लाखांचा भरणा करुन आपले वीजबिल कोरे केले आहे.
थकबाकीपोटी भरणा झालेल्या रकमेतून ग्रामपंचायत पातळीवर ३३ टक्के व जिल्हापातळीवर 33 टक्के आकस्मिक निधी वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी मिळणार आहे. त्यानुसार मुरुम (ता. बारामती) गावातील 182 शेतकऱ्यांनी 50 लाख 84 हजार रुपयांचा भरणा केला. त्यापोटी गावाला 17 लाखांचा निधी तातडीने उपलब्ध झाला. या निधीतून गावातील विजेची कामे करण्यासाठी विभागाने लागलीच मे. काळे ब्रदर्स या ठेकेदाराची नियुक्ती करत त्यांना गावातील कामे सोपविली आहेत. याचा शुभारंभ टेकवडे रोहित्रापासून करण्यात आला. या रोहित्राची वितरण पेटी, केबल्स बदलून इतर सर्व कामे करण्यात आली. यावेळी गावच्या सरपंच सौ. इंदुमती भगत, सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे, शाखा अभियंता प्रभमेश जाधव, विक्रम घोरपडे, जनमित्र मंगेश लकडे व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. महावितरणच्या या तत्परतेचे राजवर्धन शिंदे यांचेसह सर्व शेतकऱ्यांनी तोंडभरुन कौतुक करत इतर शेतकऱ्यांनाही थकबाकी भरण्याचे आवाहन केले.