कागदपत्रांच्या पडताळणीनंतर वयोवृद्धांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एजंटांनी मालकी कमी केल्याचे उघड : हुळंद येथील ग्रामस्थांचा लढ्याचा निर्णय
खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील हुळंद या गावच्या ग्रामस्थांच्या मालकीची सर्व्हे नं. 3 मधील 508 एकर जमिनीवर संबंध नसलेल्यांची नावे दाखल करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती हुळंद येथील युवकांना मिळाली. याबाबतची कागदपत्रांची पडताळणी केली असता गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही एजंटांनी ग्रामस्थांची मालकी कमी करून फक्त मोजक्याच जणांची नावे दाखल करून आपली तीन नावे दाखल केली आहेत. हे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी बैठक घेऊन याबाबत न्यायालयात दाद मागण्याचे ठरविण्यात आले असून तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
याबाबत माहिती देताना प्रकाश गावडे आणि लहू गावडे यांनी सांगितले की, तालुक्यातील अती दुर्गम हुळंद या गावची परंपरागत सर्व्हे नंबर 3 मध्ये 508 एकर जमीन आहे. या जमिनीवर हुळंद गावातील सर्वांचा हक्क असल्याचे पूर्वीपासून उताऱ्यावर नमूद आहे. अलीकडे काही एजंटांनी ही जमीन लाटण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. उताऱ्यातील कॉलम 11 मध्ये सर्व ग्रामस्थांचा हक्क नमूद होता. मात्र अलीकडे कॉलममधील ग्रामस्थांचा हक्क रद्द करून फक्त 24 जणांची नावे आणि इतर संबंध नसलेल्या परशराम पाखरे, संदीप गवस, अमित पाटील या तीन जणांची नावे उताऱ्यात नमूद करण्यात आली आहेत. हुळंद येथील सर्वचजण हे उपजीविकेसाठी गोवा येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हुळंद गावात फक्त वयस्कर लोक राहतात. सदर जमीन लाटण्यासाठी आपली नावे आमच्या गावच्या जमिनीवर लागण केली आहे. याबाबतची माहिती आम्हाला मिळताच आम्ही गावकऱ्यांनी बैठक घेऊन याबाबत चर्चा केली असता गावातील वयस्कर अशिक्षीत लोकांचा वारसा करतो म्हणून सह्या घेऊन आपली नावे उताऱ्यावर दाखल केली आहेत. त्यामुळे आम्हाला धक्काच बसलेला आहे.
हुळंद गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने दळणवळणाची तसेच इतर मूलभूत सुविधा नसल्याने उपजीविकेसाठी गोवा येथे सर्वजण वास्तव्यास आहेत. गावात फक्त वयस्कर लोक रहात असल्याने त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन जमीन लाटण्यासाठी प्रयत्न चालविलेले आहेत. ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी बैठक घेऊन आम्ही या विरोधात लढा उभारण्याचे ठरविण्यात आले असून कोणत्याही परिस्थितीत आमची परंपरागत असलेली जमीन आम्ही लाटण्यास देणार नाही, असा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. यावेळी हुळंद येथील प्रतिश गावडे, नारायण गावडे, महेश गावडे, गजानन गावडे, महादेव नाईक, महेश नाईक, पुन्नाजी पाटील, रघू शेटकर, लक्ष्मण गावडे, कृष्णा गावडे, उमेश गावडे, संजय गावडे, बाबाजी गावडे, मोतिराम गावडे, अर्जुन गावडे, विजय गवस, राकेश गावडे, सुधाकर गावडे, हेमंत गावडे, दत्तू गावडे, सीताराम गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यायालयात दाद मागणार
या तीन जणांचा आमच्या गावांशी कोणताही संबंध नाही. त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. मात्र अलीकडे काही एजंट जमीन लाटण्यासाठी वेगवगेळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. सर्व्हे नंबर 3 च्या उताऱ्यावर परशराम पाखरे, संदीप गवस, अमित पाटील यांची नावे कशी दाखल झाली. याबाबतची आम्ही पडताळणी करून या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असे गावडे म्हणाले.









