सातारा :
सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा दि. 12 ऑगस्टला झाली होती. त्यानंतर तब्बल आठ महिने सभाच झाली नसल्याने अनेक विषय प्रलंबित होते. त्यामुळे आठ महिन्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रशासकीय सभेत तब्बल 500 विषयांना दोन तासांच्या चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये स्मार्ट स्कूल, स्मार्ट आरोग्य केंद्र यांचाही समावेश असून शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या लॉकअप रुमच्याही कामास मंजुरी देण्यात आली आहे. अगदी घंटागाड्यांचे जीपीएस दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली गेली आहे. बॉम्बे रेस्टाँरंट चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याचा विषय मंजूर करण्यात आला आहे.
पालिकेच्या स्टॅण्डींग हॉलमध्ये सायंकाळी 4 वाजता मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभेला सुरुवात झाली. या सभेला अतिर्कित मुख्याधिकारी ऐश्वर्या नाईक, उपमुख्याधिकारी अरविंद दामले, आरोग्य विभागाचे प्रमुख प्रकाश राठोड, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी राठोड, वृक्ष विभागाचे प्रमुख द्विग्विजय गाढवे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
या प्रशासकीय सभेत प्रामुख्याने नगरपालिका शाळांचा विषय घेतला गेला होता. त्यामध्ये शाळा क्रमांक 8 साठी बेंच, कलर प्रिंटर असे साहित्य पुरवण्याचा विषय मंजूर केला आहे. तसेच स्मार्ट स्कूलही करण्याच्या विषयास मंजुरी दिली गेली आहे. त्याचबरोबर हुतात्मा स्मारक परिसरातील आरोग्य केंद्र हे स्मार्ट आरोग्य केंद्र करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासह पालिकेच्या मालकीच्या ज्या जागा भाडेपट्ट्याने दिलेल्या आहेत. त्या खुल्या जागांची भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसेच पालिकेच्या मालकीची 12 व्यापारी संकुले आहेत. त्या व्यापारी संकुलातील व्यापारी गाळ्यांची 10 टक्के भाडे वाढ करण्यात आली आहे. तर मल्हारपेठेतल्या 13 गाळयांची दुप्पट भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर गुरुवार पेठेतल्या जागेचा भाडेकरार रद्द करुन ती जागा पालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच शाहु कला मंदिरातील वाळवी प्रतिबंधक काम करण्यात येणार आहे. तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या लॉकअप रुमच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे.
- घंटागाड्यांकडे विशेष लक्ष
सातारा शहरात कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या आहेत. त्या 40 घंटागाड्याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. दुरुस्तीच्या कामास आणि त्यावरील जीपीएस दुरुस्तीकरता मंजुरी दिली गेली आहे. एवढेच नाही तर घंटागाड्या सुस्थितीत आहेत असा दाखला तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कचरा गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरील कर्मचारी पुरवण्याच्या कामास 4 महिन्याची मुदतवाढ दिली गेली आहे.
- क्रिकेटचा सराव करणाऱ्यांसाठी नेट सुविधा
सातारा शहरात अनेक क्रिकेटपट्टु आहेत. त्यांच्याकरता सातारा पालिकेच्यावतीने शिर्के मैदान येथे नेट प्रॅक्टीस करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विषय मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही एक खेळाडूंसाठी पर्वणी ठरणार आहे.
- त्या कर्मचाऱ्याच्या चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती
निवृत्ती वेतन विभागाकडील अनियमितता व त्रुटीच्या कामकाजाबाबत वरिष्ठ लिपिक यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचे कारवाई प्रस्तावित करण्यास व चौकशी अधिकारी नियुक्ती करण्याची चर्चाही या सभेत करण्यात आली आहे. त्यामुळे तो लिपीक कोण?, त्याने काय चुकी केली हेही स्पष्ट होणार आहे.








