तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आश्वासनांचा वर्षाव : मोफत वीज पुरविण्यात येणार
तेलंगणाकरता काँग्रेसचे घोषणापत्र सादर
तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी स्वत:चे घोषणापत्र जारी केले आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याच्या उपस्थितीत हे घोषणापत्र सादर करण्यात आले आहे. काँग्रेसने 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, मोफत वीज, मुलीच्या विवाहाकरता सोने आणि रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे.
तेलंगणाच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर कुठलेच योगदान नसलेला नेता बसला. राज्याच्या निर्मितीकरता अनेक लोकांनी गोळ्या झेलल्या, कित्येकांनी प्राणांची आहुती दिली, परंतु याचा लाभ जनतेला झाला नाही. सर्वसामान्यांच्या ऐवजी मायनिंगगमध्ये लूट करणाऱ्यांना लाभ झाल्याचे वक्तव्य खर्गे यांनी केले आहे.
कर्नाटकात ज्याप्रकारे आम्ही 5 गॅरंटी देऊन त्या पूर्ण केल्या आहेत, त्याचप्रकारे तेलंगणासाठी आम्ही 6 गॅरंटी मांडल्या आहेत. जे लोक भगवान रामाच्या नावावर मते मागत आहेत, त्यांनी काहीच केलेले नाही. काँग्रेस महिलांना बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देत आहे. बसमधून मोफत प्रवास करत महिला दररोज मंदिराचे दर्शन करत असल्याचा खर्गे यांनी केला आहे.
घोषणापत्रातील महत्त्वाच्या तरतुदी
? काँग्रेसने गॅस सिलिंडर 500 रुपयांमध्ये पुरविण्याचे आश्वासन तेलंगणाच्या जनतेला दिले आहे.
? काँग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा मिळणार.
? तेलंगणातील लोकांना 200 युनिटपर्यंतची वीज दर महिन्याला मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येणार
? इंदिराम्मा उपहार योजनेंतर्गत हिंदूंच्या मुलींना विवाहावेळी 1 लाख रुपये आणि 10 ग्रॅम सोने दिले जाणार
? अल्पसंख्याकांच्या मुलीकरता विवाहावेळी राज्य सरकारकडून 1 लाख 60 हजार रुपये देण्यात येणार
? उच्च शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक मुलीला मोफत स्कुटी देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे
घोषणापत्रातील आणखी महत्त्वाच्या बाबी
? मुख्यमंत्र्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये दररोज ‘प्रजा दरबार’ आयोजित होणार
? तेलंगणा आंदोलनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या आईवडिल किंवा पत्नीला 25 हजार रुपयांची मासिक पेन्शन तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी.
? तेलंगणा आंदोलनात सामील कार्यकर्त्यांच्या विरोधात नोंद गुन्हे मागे घेतले जाणार तसेच त्यांना भूखंड देण्यात येणार.
? शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार.
? शेतकऱ्यांना 20 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज व्याजमुक्त मिळवून दिले जाणार
? शेतकऱ्यांना 24 तास वीज विनाअडथळा पुरविण्यात येणार
? सर्व प्रमुख पिकांसाठी एक व्यापक पीक विमा योजना लागू केली जाणार
? शिक्षकांची सर्व रिक्त पदे 6 महिन्यांच्या आत डीएससीद्वारे भरली जाणार
? राज्य सरकार दरवर्षी जॉब कॅलेंडर जारी करणार, 2 लाख शासकीय रिक्त पदे पारदर्शक पद्धतीने भरली जाणार
? सर्व विद्यार्थ्यांना वाय-फाय सुविधेच्या माध्यमातून मोफत इंटरनेट प्रदान करणार
? शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 15 टक्क्यांपर्यंत निधीची तरतूद करणार
? अंगणवाडी सेविकांना मासिक वेतन 18 हजार रुपये देणार, ईपीएफची सुविधा
? गुडघ्यांवरील शस्त्रक्रियेला आरोग्यश्री योजनेंतर्गत अंतर्गत सामील केले जाणार
? भूमी सुधारणांच्या माध्यमातून गरीबांना 1 एकर जमीन मिळवून देणार
? माजी सरपंच, माजी एमपीटीसी, माजी झेडपीटीसी सदस्यांना पेन्शन देणार
? सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्यात येणार
? पत्रकारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत
? दिव्यांगांसाठी मासिक पेन्शन 6 हजार रुपये करण्यात येणार









