अंत अद्यापही दृष्टीपथाबाहेरच, अमेरिका-रशिया गुप्त चर्चा होत असल्याचे वृत्त
वृत्तसंस्था / मॉस्को
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता 500 दिवसांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही हे युद्ध त्याच्या अंतापर्यंत पोहचलेले नसून आजही दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करीत आहेत. रशियासारख्या प्रचंड शत्रूसमोर इतके दिवस यशस्वीरितीने तग धरल्यामुळे आणि रशियाला युद्ध जिंकणे अशक्य केल्याने युव्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलन्स्की यांनी आपल्या सैन्याचे कौतुक केले आहे.
झेलन्स्की सध्या ब्लॅक आयलंडस् येथे आहेत. तेथून त्यांनी सैनिकांच्या प्रती संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले. युक्रेनच्या कोणत्याही भागांवर ताबा मिळविण्यात रशियाला यश आलेले नाही. जो भाग त्यांनी बळकावला होता, त्यावर आता आमच्या सैनिकांनी पुन्हा नियंत्रण मिळविले आहे. रशियाचे मनसुबे उधळण्यात आमची सेना यशस्वी झाली आहे, असे झेलन्स्की यांनी प्रतिपादन केले.
फेब्रुवारी 2022 पासून…
24 फेब्रुवारी 2022 या दिवशी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. रशियाचे सैनिक तीन्ही बाजूंनी रशियाला लागून असलेल्या या देशात घुसले आणि त्यांनी तेथील सरकार उलथविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून आजवर हे युद्ध सातत्याने सुरु आहे. अमेरिका आणि पश्चिम युरोपातील बहुसंख्य देश या युद्धात युव्रेनच्या बाजूने उभे असून त्यांनी मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे युक्रेनने हे युद्ध पेलल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेकडून क्लस्टर बाँब
अमेरिकेने शत्रूच्या आस्थापनांवर एकाच वेळी अनेक हल्ले करणारे क्लस्टर बाँब युव्रेनला पुरविण्याचा निर्णय अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी घेतला. हे बाँब घातक असून त्यांचा उपयोग योग्य रितीने केल्यास शत्रूवर निर्णायक विजय मिळविण्याची शक्यता निर्माण होते, असे तज्ञांचे मत आहे. हे बाँब अमेरिकेने अनेक सशस्त्र संघर्षांमध्ये उपयोगात आणले आहेत. ते मिळाल्याने युक्रेनची बाजू अधिक भक्कम होईल. तसेच रशियाला अधिक प्रमाणात प्रयत्न करावे लगातील असे बोलले जाते.
पुरवठा साखळ्यांवर परिणाम
युव्रेनमध्ये गहू आणि सूर्यफूल यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अनेक देशांना या दोन वस्तू युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात पुरविल्या जात होत्या. तथापि, युक्रेनवर हल्ला झाल्याने त्याची निर्यात थंडावली असून जगात खाद्यतेल आणि गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली. अशा प्रकारे जागतिक पुरवठा साखळ्यांवर परिणाम झाला. याचा गरीब देशांना मोठा फटका बसला आहे.
रशियाची तेलनिर्यात वाढली
युद्धाचा खर्च बाहेर काढण्यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणात कच्च्या इंधन तेलाची निर्यात सुरु केली. अमेरिकेने रशियावर अनेक कठोर आर्थिक निर्बंध घातल्याने त्या देशाची निर्यात थंडावली. त्यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तेलाची निर्यात वाढविली. भारत आणि अनेक युरोपियन देशांना स्वस्त तेलाची आवश्यकता असल्याने त्यांनी रशियाकडून तेल मोठ्या प्रमाणावर घेण्यास प्रारंभ केला. आपल्या तेलाला जगात मागणी वाढावी म्हणून रशियाने या तेलाचा दर आंतरराष्ट्रीया बाजारापेक्षा बराच कमी ठेवला आहे. त्यामुळे भारत आणि अनेक युरोपियन देशांचा लाभ झाला. भारताची अमेरिकेला आवश्यकता असल्याने त्या देशाने आतापर्यंत भारत रशियाकडून होत असलेल्या तेलखरेदीकडे दुर्लक्ष केले आहे.
प्रत्यक्ष सहभाग नाही
अमेरिका किंवा कोणत्याही युरोपियन देशाने या युद्धात आपली सेना पाठवून हस्तक्षेप थेट प्रकारे केलेला नाही. त्यामुळे हे युद्ध दोन देशांपुरतेच राहिले असून त्याचा विस्तार झालेला नाही. मात्र, या देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा पुरवठा विनामूल्य किंवा अत्यल्प किमतीत केला आहे.
चीन रशियाच्या बाजूने
या संघर्षात चीनने कित्येकदा रशियाचे उघड समर्थन केले आहे. रशियाला शस्त्र पुरवठाही केल्या असल्याचा आरोप त्या देशावर आहे. चीनने आरोप नाकारले असले तरी, तरी तो रशियाचा पाठीराखा आहे हे लपून राहिलेले नाही. भारताची भूमिका चर्चेच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवा अशी आहे. भारताने ही भूमिका प्रकटरित्या जगातिक व्यासपीठांवरुन मांडली असल्याचे दिसून येते.
अमेरिका-रशिया गुप्त चर्चा ?
युद्धासंबंधी रशियाने अमेरिकेशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. अद्याप दोन्ही देशांनी याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, काही रशियन अधिकारी अमेरिकेत आले असून त्यांनी गुप्तपणे चर्चा चालविली असल्याचे बोलले जाते. तशी चर्चा होत असल्यास ते शांततेच्या दृष्टीने चांगले असल्याचे तज्ञांचे मत आहे.
युद्ध थांबण्याची अपेक्षा
ड रशिया-युक्रेन युद्ध अधिक लांबू नये ही जगाची अपेक्षा
ड आतापर्यंत मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी, दोन्ही बाजू ठाम
ड पुरवठा साखळ्या तुटल्यामुळे जगात महागाईची समस्या
ड युव्रेनला अमेरिकेसह अनेक देशांचा शस्त्रांस्त्रांचा पुरवठा









