विशेष स्वच्छता मोहिमेतून केंद्र सरकारला अर्थलाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांमधील प्रलंबित सार्वजनिक तक्रारींचे कागदपत्र आणि न वापरलेल्या फाईल्स इत्यादींचा निपटारा करण्यासाठी तिसऱ्या विशेष स्वच्छता मोहिमेंतर्गत एकूण 23.09 लाख फाईल्स (कागद आणि इलेक्ट्रॉनिक) निकाली काढण्यात आल्या. 2 ऑक्टोबर, गांधी जयंती ते 31 ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील विविध विभागांमधील सरकारी कार्यालयांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावण्यापासून 500 कोटी रुपयांचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. तसेच कागदपत्रे आणि इतर साहित्य रद्दीत टाकल्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये बरीच मोकळी जागाही उपलब्ध झाली आहे.
स्वच्छता आणि प्रलंबित तक्रारींच्या फाईल्स निकाली काढण्यासाठीची ‘विशेष मोहीम 3.0’ यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली. विशेष मोहीम 3.0 ही स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठी मोहीम ठरल्याचे डॉ. सिंह यांनी तिसऱ्या मोहिमेच्या समारोपप्रसंगी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर देशातील दुर्गम भागातील 2.53 लाखाहून अधिक कार्यालयांचा समावेश असलेल्या स्वच्छता मोहिमेसाठी ‘विशेष मोहीम 3.0’मध्ये संपूर्ण विल्हेवाटीचा दृष्टीकोन अवलंबण्यात आला, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2021 ते 2023 या कालावधीत आत्तापर्यंत 1.0, 2.0 आणि 3.0 अशा एकूण तीन विशेष मोहीम राबविण्यात आल्या. यामध्ये कार्यालयीन भंगाराच्या विल्हेवाटीने 1,100 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.









