क्रिकेटच्या विश्वात काही मैदानांनी खेळाडू नि रसिकांच्या मनात अगदी घर केलंय…उदाहरणार्थ इंग्लंडमधील लॉर्ड्स…तिथं खेळणं, यशाची चव चाखणं याची खेळाडूंसाठी अनुभूती वेगळीच…भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणता येणाऱ्या मुंबईतील वानखेडेचं स्थानही तसंच. म्हणून सुनील गावस्करपासून सचिन तेंडुलकरपर्यंत आणि महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, विराट कोहलीपासून आजच्या सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मापर्यंत साऱ्यांसाठी या मैदानावर प्रताप गाजविण्यास महत्त्व राहिलंय ते वेगळंच…
19 जानेवारी, 1974…मुंबईत एका स्टेडियमनं जन्म घेतला अन् पाहता पाहता कोट्यावधी रसिकांच्या ह्रदयात त्यानं अढळ स्थानही मिळविलं. नुकतीच त्या मैदानानं पन्नाशी गाठलीय…दक्षिण मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमपासून फक्त एका मैलावर तो 13 महिन्यांत उभारण्यात आला अन् सुरुवातीला त्याची क्षमता होती 45 हजार…मुंबईचा जगप्रसिद्ध वानखेडे स्टेडियम !
वानखेडे स्टेडियमच्या जन्मास कारण ठरलं ते ‘बॉम्बे क्रिकेट असोसिएशन’ (बीसीए) म्हणजेच सध्याची ‘मुंबई क्रिकेट संघटना’ आणि ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ (सीसीआय) यांच्या मालकीच्या ब्रेबॉर्न स्टेडियममधील वादानं…हा स्टेडियम निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक कसोटीचं आयोजन केलं जायचं ते ‘सीसीआय’कडूनच…महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन सभापती व ‘बीसीए’चे सचिव बॅरिस्टर शेषराव कृष्णराव वानखेडे यांनी भारत नि इंग्लंड यांच्यात 1973 साली ब्रॉर्नवर रंगलेल्या कसोटी सामन्याची जास्त तिकिटं देण्याची विनंती केली असता भारताचे माजी महान फलंदाज व ब्रेबॉर्नचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी ती चक्क फेटाळून लावली…
त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्र सरकारला ब्रेबॉर्नवर एका प्रदर्शनीय सामन्याचं आयोजन करण्याची इच्छा होती. पण ती देखील नाकारण्यात आली अन् ज्वाला भडकायला वेळ लागला नाही…वानखेडेना त्यावेळी प्रकर्षानं गरज वाटली ती ‘बॉम्बे क्रिकेट असोसिएशन’च्या अधिपत्याखाली एक वेगळा स्टेडियम साकारण्याची. मग त्यांनी शरद पवार क्रीडामंत्री असलेल्या महाराष्ट्र सरकारकडून जमीन मिळविण्याचं महत्त्वाचं काम केलं. ‘बीसीए’च्या खिशात पैसे नसल्यानं (आजच्या काळात या गोष्टीवर विश्वास बसणं कठीण होईल) सारा भर देण्यात आला तो देणग्यांवर…सर्वांत जास्त आर्थिक मदत केली ती ‘टाटा समूह’ नि ‘गरवारे समूहा’नं. त्यामुळं दोन्ही पॅव्हिलियन्सना नावं देण्यात आली ती त्यांचीच. स्टेडियमच्या तळमजल्यावर जागा उपलब्ध असल्यानं तिथं कचेऱ्यांची निर्मिती करून ती भाड्यानं देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला…
ही जागा त्यापूर्वी मुंबई विद्यापीठाला देण्यात आली होती आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी त्याचा वापर करायचे. वानखेडे स्टेडियम उभारणं ही सोपी गोष्ट नव्हती. कारण एका बाजूला रेल्वेमार्ग व हॉकी स्टेडियम, तर दुसरीकडे निवासी इमारती. त्यांच्यामध्ये असलेल्या जमिनीत तो उभारण्याचं अफलातून कौशल्य तत्कालीन अभियंत्यांनी दाखविलं…त्यातील जुना ड्रेसिंग रूम हा मैदानापासून जरा दूर असल्यानं खेळाडूंवर जास्त चालण्याची पाळी यायची आणि खिळे असलेले बूट घालून चालणारा एक खेळाडू 1974 सालच्या रणजी चषकातील सामन्याच्या वेळी पडला देखील होता…
त्यानंतर वानखेडेनं कात टाकली ती 2011 साली. भारतानं आयोजित केलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचा मुहूर्त साधून शरद पवार यांच्या ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’नं या स्टेडियमचं रुपडं पार बदललं, नववधूप्रमाणं सजविलं…पूर्वी खुर्च्यांवर क्रमांक नसायचे आणि लाकडाच्या बाकड्यांवर बसण्याची पाळी यायची. शिवाय ‘क्यूआर कोड सिस्टम’ नसल्यानं तिकिटं न काढणाऱ्यांना देखील घुसण्याची संधी मिळायची…ड्रेसिंग रूमच्या वरती खास बॉक्सची तरतूद करण्यात आली होती ती माजी खेळाडूंसाठी अन् त्यात दर्शन घडायचं ते भारताच्या माजी महान कसोटीवीरांचं. जगातील अन्य कुठल्याही ठिकाणी हे चित्र दिसणं कठीण होतं…पण या सर्व गोष्टी आता भूतकाळात जमा झाल्याहेत…
प्रसिद्ध ग्राउंड्समन वसंत मोहिते यांनी सांगितलेल्या आठवणींनुसार, तरुणपणी सचिन तेंडुलकर मैदानात शिरल्यानंतर कुठं बसायचं हे त्यांना विचारायचा…सध्या मैदानावरील स्टँड्सना सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विजय मर्चंट यांची नावं देण्यात आलीत. सचिन, सुनील, अजित वाडेकर, रवी शास्त्राr, पद्माकर शिवलकर, दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, कपिल देव, चंद्रशेखर, वेंकटराघवन, बिशनसिंग बेदी, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यासह असंख्य देशी तसंच अन्य कित्येक विदेशी महान खेळाडूंना अनुभवण्याची संधी वानखेडेला मिळालीय. किती क्रिकेटपटू या मैदानावर घडले नि किती त्यावरून यशोशिखरावर झेपावले त्याची गणतीच नाही…आज भारतभरात असंख्य स्टेडियम्स उभे राहिलेत. पण पन्नाशी उलटलेल्या वानखेडेचं महत्त्व वेगळंच !
वानखेडेवरील सर्वांत अविस्मरणीय क्षण…
- 2011 : वानखेडे स्टेडियमवरील सर्वांत अविस्मरणीय क्षण म्हणजे 2 एप्रिल या दिवशी यजमान भारतानं पटकावलेलं एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद…कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं लाँग ऑनवरून श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराला खेचलेला उत्तुंग षटकार खेचला अन् सारा देश अक्षरश: जल्लोषाच्या महासागरात बुडाला. भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची करामत नोंदविली…
- 2013 : सचिन तेंडुलकरनं त्याच्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला एकंदरित 664 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि 200 व्या कसोटी सामन्यात पूर्णविराम देण्याकरिता निवड केली ती आपल्या या घरच्या मैदानाची. त्यानं पहिल्यांदा क्रिकेटचे धडे गिरविले ते याच स्टेडियमलगतच्या परिसरात…सदर लढतीत भारतानं वेस्ट इंडिजला एक डाव आणि 126 धावांनी पराभूत केलं आणि सचिननं त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 74 धावा केल्या…कसोटीच्या शेवटच्या दिवशी सचिनचे हजारो चाहते त्याला भारतीय जर्सीमध्ये शेवटच्या खेपेला पाहण्यासाठी जमले होते. तेंडुलकरसह तेही यावेळी भावनाविवश झाल्याशिवाय राहिले नाहीत…
- भारतानं 1983 साली एकदिवसीय विश्वचषक प्रथमच इंग्लंडमध्ये जिंकल्यानंतर, 2007 मध्ये पहिलावहिला टी-20 जागतिक करंडक खात्यात जमा केल्यानंतर अन् रोहित शर्माच्या संघानं 2024 साली दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद उचलल्यानंतर प्रत्येक वेळी सर्वांचा भव्य गौरव करण्यात आला तो वानखेडे स्टेडियमवरच…
पहिल्याच कसोटीत दंगल…
- 1975 : वानखेडेवर झालेला भारताच्या दौऱ्यावरील वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिलाच कसोटी सामना क्लाईव्ह लॉईडच्या संघानं मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा 201 धावांनी पराभव करून जिंकला. पण त्या लढतीला डागाळलं ते हिंसेनं. लॉईडचं अभिनंदन करण्यासाठी एका अतिउत्साही प्रेक्षकानं मैदानात प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी त्याची पिटाई केली आणि दंगल सुरू होण्यास ती ठिणगी पुरेशी ठरली. सुमारे 90 मिनिटं गोंधळ चालू होता…
स्टेडियम यांचाही साक्षीदार…
- 1985 : रणजी स्पर्धेत मुंबईतर्फे खेळणाऱ्या रवी शास्त्राrनं बडोद्याच्या तिलकराजला लागोपाठ सहा षटकार हाणले अन् त्यानंतर नोंद केली ती प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यावेळच्या सर्वांत वेगवान द्विशतकाची…
- 1990 – 91 : रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा संघ कपिल देवच्या हरयाणाविरुद्ध अवघ्या दोन धावांनी हरला अन् प्रथम अश्रू अनावर झाले ते ‘कर्नल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप वेंगसरकरना. त्यानंतर अचाट दृष्य दिसलं ते सारा स्टेडियम रडत असल्याचं…
- नव्वदच्या दशकात सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे व विनोद कांबळी हे प्रख्यात प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य एकाच भारतीय संघातून खेळताना दिसले…
- 2002 : फेब्रुवारी, अँड्य्रू फ्लिंटॉफच्या इंग्लंडनं एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताशी वानखेडेवर 3-3 अशी बरोबरी साधली नि त्यानंतर फ्लिंटॉफनं शर्ट काढून आपला आनंदोत्सव साजरा केला…त्यानंतर त्याच वर्षी जुलैमध्ये भारतीय कर्णधार सौरव गांगुलीनं नॅटवेस्ट मालिका इंग्लंडवर मात करून जिंकल्यानंतर फ्लिंटॉफला प्रत्युत्तर दिलं ते त्याच पद्धतीनं…
- 2011 : भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामना अत्यंत रोमांचक स्थितीत ‘टाय’ झाला तो याच मैदानावर. इतिहासातील तो होता अशा प्रकारचा फक्त दुसरा क्षण…
- 2021 : न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज एजाज पटेलनं भारताचे एका डावात सर्व 10 बळी खिशात घालण्याचा प्रताप गाजविला…
- 2023 : वानखेडे स्टेडियमनं पाहिलं ते विराट कोहलीनं एकदिवसीय लढतीत नोंदविलेलं 50 वं शतक…न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीत त्यानं हा पराक्रम नोंदविला…
– राजू प्रभू









