प्रोजेक्ट एलिफेंटला 30 वर्षे पूर्ण ः दोन्ही प्रकल्पांसाठी आता सामायिक निधी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत हा जगातील प्रमुख जैववैविध्य असणाऱया देशांपैकी एक आहे. भारतात असंख्य प्रकारच्या वन्यजीवांच्या प्रजाती आढळून येतात. या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भारतात अनेक अभयारण्ये निर्माण करण्यात आली आहेत. याचबरोबर केंद्र सरकारकडून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनेक योजना चालविल्या जात आहेत. चालू वर्षात प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे तर प्रोजेक्ट एलिफेंटला 30 वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन्ही प्रमुख वन्यजीव संरक्षण योजना ‘प्रोजेक्ट टायगर’ आणि ‘प्रोजेक्ट एलिफेंट’साठी निधी एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्यांना संचालनासाटी एक सामान्य वार्षिक योजना सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.
प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफेंटसाठी प्रशासकीय व्यवस्था पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. केवळ एका सामायिक नावाखाली दोन्ही प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. पूर्वीच्या दोन वार्षिक संचालन योजनांच्या तुलनेत दोन योजनांसाठी केवळ एक एपीओ (ऍन्युअल प्लॅन ऑफ ऑपरेशन्स) राहणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.

हा एपीओ निर्णय प्रभावी एकीकरण आणि साधनसामग्रीच्या कुशल वापराचा लाभ मिळवून देणार आहे. तसेच निधी वितरणाची प्रक्रिया सुलभ होत वेळ वाचणार आहे. दोन्ही योजनांच्या अंतर्गत व्यापण्यात आलेल्या क्षेत्राच्या 80 टक्के भाग सामायिक आहे. ओव्हरलॅपिंगची समस्या वाघ आणि हत्ती एकाच अधिवासात असल्याने निर्माण होत असल्याचे वनाधिकाऱयाने म्हटले आहे.
सद्यकाळात राज्य प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफेंट अंतर्गत एकाच क्षेत्रासाठी वेगवेगळय़ा एपीओ पाठवितात. यातून ओव्हरलॅपिंगची शक्यता निर्माण होत आहे. आता केवळ एक एपीओ असणार आहे. दोन्ही योजनांसाठी प्रशासकीय सेटअप वेगवेगळा उपलब्ध असेल. केवळ निधी एकत्रित करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे.
तत्कालीन नियोजन आयोगाने 2011 मध्ये तीन केंद्रपुरस्कृत योजना प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफेंट आणि डेव्हलपमेंट ऑफ वाईल्डलाइफ हॅबिटॅटच्या विलयाचा प्रस्ताव दिला होता. प्रोजेक्ट एलिफेंटला 30 वर्षे पूर्ण होणार असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 एप्रिल रोजी आसामच्या काझिरंगा अभयारण्यात दोन दिवसीय ‘गज उत्सवा’चे उद्घाटन करणार आहेत.
50 वर्षांच्या प्रयत्नांना यश
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 3 हजार वाघ आहेत. जगातील एकूण वाघांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 70 टक्के आहे. वाघांची ही संख्या दरवर्षी 6 टक्के दराने वाढत आहे. परंतु काही दशकांपूर्वी भारताला वाघांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोहीम हाती घ्यावी लागली होती. या मोहिमेला ‘प्रोजेक्ट टायगर’ नाव देण्यात आले होते. या मोहिमेला शनिवारी 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने पहिल्यांदा 1 एप्रिल 1973 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात प्रोजेक्ट टायगरची सुरुवात केली होती. योजनेच्या प्रारंभी 18278 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या 9 व्याघ्र अभयारण्यांना सामील करण्यात आले होते. 50 वर्षांनंतर हे क्षेत्र 53 व्याघ्र प्रकल्पांपर्यंत विस्तारले आहे.
9 एप्रिलला विशेष नाणी जारी होणार
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकार 9 एप्रिलपासू म्हैसूरमध्ये तीन दिवसीय कार्यक्रम सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सामील होतील. त्यांच्या उपस्थितीत देशातील वाघांच्या संख्येचा नवा आकडा प्रसिद्ध केला जाणार आहे. याचबरोबर प्रोजेक्टच्या यशाप्रित्यर्थ एक विशेष नाणे सादर केले जाणार आहे.









