कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
जंगलांचा विकास आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र वनविभागाची सुरक्षा भेदून शिकारी राजरोसपणे वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यात झालेल्या कारवाईवरुन हे दिसून येत आहे. 2022 ते 11 मार्च मार्च 2025 या कालावधीत जिल्ह्यात 50 वन्यप्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. या कारवाईत 123 शिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
चंदगड, आजरा, गडहिंलग्ज, भुदरगड राधानगरी हा परिसर हिरवाईने नटलेला आहे. या परिसरात जंगलव्याप्त क्षेत्र मोठे असल्यामुळे वन्यप्राण्यासाठी हा परिसर अधिवासाठी सुरक्षित आहे. यामुळे या परिसरात वाघ, बिबट्या, अस्वल यासह वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकून आहे. वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. वनविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत स्थानिकांची संख्याही मोठी आहे. त्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींवरही गुन्हे दाखल झाले आहेत. स्थानिकाशिवाय बाहेरील राज्यात टोळया वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. बंदुकीसह या टोळया दाट जंगलात वस्ती करुन शिकार करुन पसार होतात. या टोळया कधीतरीच वनविभागाच्या हाताला लागतात.
2022 ते 11 मार्च 2025 या सत्तावीस महिन्यांच्या कालावधीत 50 वन्यप्राण्यांची हत्या झाली आहे.याप्रकरणी 123 संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. 242 गावठी बॉम्ब, बंदुकी असा शस्त्रसाठा जप्त करुन 33 वाहने ताब्यात घेतली आहेत. याशिवाय इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
- 2022 ते आजअखेर वनविभाकडून करण्यात आलेली कारवाई
वनपरिक्षेत्र अवैध शिकार संख्या आरोपी जप्त वाहने बंदूक इतर
करवीर 12 27 14 2 18
पन्हाळा 2 4 0 0 6
मलकापूर 7 15 1 10 8
पेंडाखळे 4 9 2 3 13
गगनबावडा 3 10 1 3 4
राधानगरी 2 9 4 1 10
गारगोटी 3 10 0 1 3
कडगाव 3 5 2 0 47
आजरा 4 16 1 0 6
चंदगड 5 10 1 104 8
पाटणे 5 8 7 120 8
एकूण– 50 123 33 242 131
- जंगलातील शिकारी थांबवण्यासाठी कडक कारवाई
कोल्हापूर वनविभाच्या वनपरिक्षेत्रात दुर्मिळ वन्यप्राण्यांचे संरक्षण व जतन होण्यासाठी वनविभाकडून सर्व पातळीवर प्रयत्न होत आहेत. शिकाऱ्यांना ट्रॅप करण्यासाठी जंगलात कॅमेरे बसवले आहेत. तसेच रात्रीची गस्त वाढवली आहे. तर शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.
जी.गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक
- वनविभागाच्या कारवाया वाढल्या की शिकारी
गेल्या वर्षभरात शिकारीच्या घटना वाढल्या आहेत हे कारवाईवरुन दिसून येते. पण शिकारी यापूर्वीही होत होत्या. कारवाईमुळे हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे असा वनविभागाचा दावा आहे.
- वन्यप्राण्याकडून हल्ले
जंगलातून मोठे रस्ते होत आहेत.याबरोबरच अनेक प्रकल्प होत आहेत.यामुळे मोठया प्रमाणात वृक्षतोड सुरु असून पर्यावरणाला आणि वन्यप्रमाण्यांना धोका पोहोचत आहे. यामुळे वन्यप्रमाणी मानवी वस्तीत घुसून जनांवरावर हल्ले करत आहेत. परिणामी मानव आणि वन्यप्राणी असा संघर्ष सुरु आहे.








