शेतकरी संघटनेची विविध मागण्यांसाठी निदर्शने
बेळगाव : पावसाअभावी राज्यात पिकांची हानी झाली आहे. त्यामुळे सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या नेगीलयोगी शेतकरी संघटनेने केल्या आहेत. शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वरील मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले असून राज्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. खानापूर तालुक्यात तर शेतकरी व गरिबांची सरकारी कार्यालयात कामे होत नाहीत, अशी स्थिती आहे. सरकारी कार्यालयात दलालच अधिकारी बनले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. महसूल मंत्र्यांनी सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार रोखून थेट अधिकाऱ्यांकडून कामे होतील, याची व्यवस्था करावी. दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबरोबरच खासगी इस्पितळात आयुष्मान भारत आरोग्य योजना लागू करावी व बेळगाव तालुक्यात सुपीक जमिनीत सुरू असलेली महामार्गांची व फ्लायओव्हरची कामे बंद करावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. निवेदनावर कल्लाप्पा हरीलाल, कल्लाप्पा रपाटी, बाळाप्पा नांगनूर, रवी पाटील, राजू मरवे, गणपती गावडे आदींच्या सह्या आहेत.









