सुकामेवा खरेदीच्या बहाण्याने गल्ला केला साफ : देशपांडे गल्लीतील दुकानात घटना
बेळगाव : सुकामेवा खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात गेलेल्या बंटी आणि बबलीने गल्ल्यातील 50 हजार रुपयांचा बंडल पळविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी देशपांडे गल्ली येथे घडली आहे. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. यासंबंधी शगुन ड्रायफ्रुट्सचे संचालक चेतन जैन यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन नोटांचे बंडल पळविणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध सुरू केला आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपलब्ध माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सुकामेव्याच्या दुकानात दोन तरुणी व एक तरुण आला. त्यांनी सुकामेवा खरेदी करून त्याचे पैसेही दिले. त्यावेळी मालक कामानिमित्त बाहेर गेले होते. दोन कामगार तरुणी दुकानात होत्या. हीच संधी साधून खरेदीसाठी गेलेल्या तरुणाने 500 रुपयांची नोट देऊन चिल्लर मागितली. दुकानात काम करणाऱ्या तरुणीने त्याला 500 ची चिल्लर दिली. त्यानंतर त्या नोटा परत करत आपल्याला या नोटा नको, गांधी नोटा द्या, असे सांगत तो सरळ गल्ल्याजवळ घुसला. गल्ल्यात हात घालून नोटा शोधण्याच्या बहाण्याने 50 हजार रुपयांचे बंडल आपल्या खिशात घातले. त्यानंतर एका ऑटोरिक्षातून एक तरुण व एक तरुणी तेथून निघून गेले. प्रत्यक्षात दोन तरुणी व एक तरुण दुकानात आले होते. तेथून बाहेर पडताना मात्र दोघेच ऑटोरिक्षातून बाहेर पडले. त्यामुळे या गुन्ह्यामागे दोघे जणच आहेत, की तिसऱ्या तरुणीचाही हात आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे.









