ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Lumpy Skin Disease लम्पी या संसर्गजन्य रोगाने देशात थैमान घातलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह 9 राज्यात या रोगाने हातपाय पसरले असून, 49 हजार 526 गाईंचा बळी घेतला आहे. रोगाचे गांभीर्य ओळखून पशू वैद्यकीय यंत्रणेने गाईंचे लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. लसीकरणामुळे हा रोग लवकरात लवकर आटोक्यात येऊ शकतो.
लम्पी हा गाईंना होणारा संसर्गजन्य त्वचारोग आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, गुजरात, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात या रोगाची साथ आहे. केंद्र सरकारने या साथीची गंभीर दखल घेत या राज्यांमध्ये गाईंच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. पशू वैद्यकीय यंत्रणेनेकडून लसीकरणाच्या कार्याला वेग आला आहे. 2019 मध्ये या रोगाची साथ आली होती.
अधिक वाचा : धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा शेतकऱ्यांकडून निषेध; काळे झेंडे दाखवत ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा
महाराष्ट्रात गाईंना लम्पीची लागण होण्याचे हे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रात जळगाव, अकोला, अहमदनगर आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये लम्पीची साथ मोठय़ा प्रमाणात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 36 हजार गाईंचे लसीकरण करण्यात आले आहे. तर 11 गाईंचा या रोगाने मृत्यू झाला आहे.









