5 वर्षांसाठी घेता येणार परवाना : दुकानदारांच्या आंदोलनाला अखेर यश
बेळगाव : अधिक महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने मद्यविक्री दुकानांच्या परवाना नूतनीकरण शुल्कात 100 टक्के वाढ करण्याची योजना आखणाऱ्या राज्य सरकारने आता दुकानदारांच्या मागणीनुसार नूतनीकरण शुल्कात 50 टक्के वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच परवान्याच्या वार्षिक नूतनीकरण कालावधीत 5 वर्षे वाढ करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सुधारित आदेश 1 जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे सरकारने या घेतलेल्या निर्णयामुळे मद्यविक्री दुकानाच्या आंदोलनाला यश आले असून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची मद्यविक्री दुकाने आहेत. या माध्यमातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. सरकारने पंचहमी योजना जारी केल्यानंतर सरकारच्या तिजोरीवर त्याचा भार पडत आहे. त्यामुळे वर्षभरात तीनवेळा अबकारी शुल्कात वाढ करण्यात आल्याने मद्याच्या दरात वाढ झाली आहे. 2016 मध्ये मद्यविक्री दुकानांच्या परवाना नूतनीकरण शुल्कात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे सरकार गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार परवाना शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव देत होते. मात्र मद्यविक्री दुकानदारांच्या तीव्र विरोधामुळे सदर प्रस्ताव दरवर्षी पुढे ढकलण्यात येत होता.
त्यामुळे यंदा राज्य सरकारने मद्यविक्री परवाना शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानदारांनी कर्नाटक मद्यविक्री संघाच्या नेतृत्वाखाली बेंगळूर येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत सरकारने परवाना शुल्क दुप्पट करण्याऐवजी त्यात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यविक्री दुकानदारांना दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागत होते. यासाठी जुना परवाना, त्याचबरोबर ब्लू प्रिंट आणि आहार खात्याचा परवाना घेऊन अबकारी खात्याच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे दुकानदारांची ही कटकटसुद्धा दूर व्हावी यासाठी सरकारने एक वर्षाऐवजी 5 वर्षांपर्यंत परवान्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णयही घेतला आहे.
एकंदरीत परवाना नूतनीकरण शुल्कात 50 टक्के वाढ करण्यात आल्याने या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणार आहे. सध्या राज्यात 13 हजाराहून अधिक मद्यविक्री करणारी दुकाने आहेत. दरवर्षी 30 जूनपर्यंत परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागते. मात्र यंदा नूतनीकरणाच्या शुल्कावरून निर्णय घेण्यास विलंब झाल्याने जुलैपर्यंत परवान्याचे नूतनीकरण करून घेण्यास वेळ वाढवून दिली जाण्याची शक्यता आहे. बेळगाव दक्षिण जिल्ह्यात 379 इतकी मद्यविक्री दुकाने आहेत. या माध्यमातून अबकारी खात्याला दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो.
मद्यविक्री परवाना नूतनीकरणात 50 टक्के वाढ
अबकारी खात्याच्या बेळगाव दक्षिण जिल्ह्यात 379 मद्यविक्री परवाने आहेत. सरकारने परवाना नूतनीकरण शुल्कात 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 5 वर्षांपर्यंत परवान्याची मुदत वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरवर्षी 30 जूनपर्यंत परवान्याचे नूतनीकरण केले जात होते. मात्र यंदा जुलैपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
– वनजाक्षी एम. अबकारी उपायुक्त, बेळगाव दक्षिण जिल्हा









