सरकारने योजनेची मुदत वाढविली
बेळगाव : वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठीच्या ई-चलनमध्ये पुन्हा 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंबंधी सरकारने एक आदेश जारी केला आहे. याचा फायदा वाहनचालकांना होणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. बेल ट्रॅक व्यवस्थेमुळे आता वाहतूक पोलिसांविना शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना घरपोच नोटिसा धाडल्या जातात. अनेकजण दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनचालकांसाठी आता ही योजना फायदेशीर ठरणार आहे. 11 फेब्रुवारी 2023 पासून एक ठरावीक मुदतीपर्यंत ई-चलनमध्ये निम्मी सूट देण्यात आली होती. 50 टक्के सूट देऊनही दंड भरण्याकडे त्यावेळी बेळगावात वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. बेळगाव वगळता राजधानी बेंगळूरसह अनेक ठिकाणी या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 14 जून 2023 रोजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दंडात 50 टक्के सूट देण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता 9 सप्टेंबर 2023 पर्यंत ही योजना वाढविण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी 2023 च्या आतील वाहतूक नियम मोडलेल्या प्रकरणांमध्ये आता वाहनचालकांकडून निम्मा दंड आकारला जाणार आहे.
वाहनचालकांनी वेळेत दंड भरून लाभ घ्यावा
ई-चलन भरणाऱ्यांसाठी सरकारने मुदतवाढ दिली आहे. 9 सप्टेंबरच्या आत दंड भरणाऱ्यांना 50 टक्के सूट असणार आहे. वाहनचालकांनी वेळेत दंड भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे.









