मुदतीनंतर भरावी लागणार पूर्ण रक्कम : पी. व्ही. स्नेहा
बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारण्यासाठी सध्या सरकारने 50 टक्के सूट दिली आहे. 4 मार्चपासून आणखी 15 दिवस यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून मुदतीच्या आत दंड भरणाऱ्यांना या सवलतीचा फायदा होणार आहे. 50 टक्के सूट देऊनही या उपक्रमाला बेळगावकरांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. कार, ऑटोरिक्षा, दुचाकी व इतर वाहने चालविताना वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याची प्रकरणे दाखल होतात. अशा प्रकरणांत संबंधितांना नोटिसा काढून दंड भरण्याची सूचना केली जाते. अनेकांनी वारंवार वाहतूक नियम मोडूनही दंड मात्र भरला नाही. राज्य कायदा सेवा प्राधिकरणाने ई चलनच्या माध्यमातून दंड भरणाऱ्यांना 50 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात यासाठी 15 दिवस मुदत देण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यातून या उपक्रमाला वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे 4 मार्चपासून पुन्हा 15 दिवस मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
यासंबंधी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आणखी 9 दिवस दंड भरणाऱ्यांसाठी 50 टक्के सुट असणार आहे. गेल्या चार दिवसांत 2 हजार 923 प्रकरणांत 5 लाख 28 हजार 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. ज्यांनी दंड भरायचा शिल्लक आहे त्यांनी सरकारने जाहीर केलेल्या मुदतीत दंड भरल्यास त्यांना दंड रक्कमेत 50 टक्के सूट मिळणार आहे, असे सांगितले. पहिल्या 15 दिवसांत 38 हजार 691 वाहतूक नियम उल्लंघन केल्या प्रकरणी 79 लाख 22 हजार 950 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सध्या सर्वच वाहनांची काटेकोर तपासणीही केली जात आहे. ज्यांनी दंड भरायचा शिल्लक आहे त्यांनी सरकारने सवलत जाहीर केलेल्या मुदतीत दंड भरावा. मात्र, ही मुदत संपल्यानंतर पूर्ण प्रमाणात दंड आकारण्यात येईल, असेही पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.









