स्वीत्झर्लंडचे सरकार देणार रक्कम
छोटय़ा-मोठय़ा शहरांमध्ये आणि विशेषकरून औद्योगिक शहरांमध्ये राहणाऱया लोकांचे स्वतःचे सुंदर घर असावे असे स्वप्न असते. परंतु बहुतांश लोकांना हे शक्य होत नाही. परंतु जर तुम्हाला एखाद्या पर्वतीय भागातील गावात स्थायिक झाल्यास सरकार आलिशान घर देण्यासह सुमारे 50 लाख रुपये देईल असे सांगितल्यास विश्वास बसेल का? एका देशाचे सरकार काहीशी अशीच ऑफर देत आहे, परंतु याकरता काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत.
हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 4265 फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. हिमाच्छादित पर्वतांदरम्यान वसलेले हे गाव मनमोहक आहे. या गावातील वातावरण अत्यंत स्वच्छ आहे. अल्बीनेन नावाचे हे गाव स्वीत्झर्लंडमध्ये आहे. अनेकदा एखाद्या पर्वतीय भागात गेल्यावर मोकळी हवा अन् सुंदर वातावरणातून परतण्याची इच्छा होत नाही. परंतु याच्या उलट सुंदर पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अल्बीनेन गावात लोकांची पलायन सुरू केले आहे.
या गावाची लोकसंख्या सातत्याने घटत आहे. 2022 मध्ये या गावातील लोकसंख्या 243 वर आली होती. पलायन रोखणे आणि लोकांना येथे स्थायिक करत गावाच्या अर्थव्यवस्थेला वाचविण्याकरता स्वीत्झर्लंडच्या सरकारने ही ऑफर दिली आहे. हे गाव फ्रान्स आणि इटलीला लागून असलेल्या सीमेनजीक आहे.

..तर परत करावी लागणार रक्कम
स्वीत्झर्लंड सरकारच्या ऑफरनुसार तुमच्या कुटुंबात चार सदस्य असल्यास प्रत्येक प्रौढ सदस्याला सुमारे 22,500 पाउंड म्हणजेच 22 लाख रुपयांहून अधिक आणि प्रत्येक मुलाला सुमारे 9 हजार पाउंड म्हणजेच 8 लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली जाणार आहे. या गावात स्थायिक होण्याची ऑफर स्वीकारणाऱयांचे वय 45 वर्षांपेक्षा कमी असू नये अशी सरकारची अट आहे. याचबरोबर परमिटसोबत संबंधिताने स्वीत्झर्लंडचा नागरिक असणे आवश्यक आहे. ही ऑफर स्वीकारल्यास कमीत कमी 10 वर्षे याच गावात वास्तव्य करावे लागणार आहे. यापूर्वी गावातून बाहेर पडण्याची इच्छा असल्यास ऑफर अंतर्गत मिळालेली पूर्ण रक्कम परत करावी लागणार आहे.
गावातून पलायन का?
अल्बीनेन गावात रोजगाराच्या संधी सातत्याने कमी होत आहेत. लोकांची संख्या कमी झाल्याने येथील सर्व शाळा बंद झाल्या आहेत. 243 लोकांमध्ये केवळ 7 मुलांचा समावेश आहे. ही मुले दररोज बसने नजीकच्या एका वस्तीतील शाळेत जात असतात. येथील बहुतांश घरं ओस पडली असून सरकार याच घरांमध्ये लोकांना वसविण्याची ऑफर देत आहे. या गावात जमीन खरेदी करून घर बांधण्याची इच्छा असणाऱयांना सरकार विशेष सवलती देणार आहे.









