पुणे / वार्ताहर :
श्रीमंत बाजार कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिक महिलेसह चारजणांची 50 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी श्रीकांत रामाचार होलेहुन्नर (रा. पिंपळे निलख, पुणे) व नितीन विलास कोष्टी (42, रा. पिसोळी, पुणे) या आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ऐश्वर्या अनिल ढमाळ (वय 26, रा. लोणीकाळभोर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत होलेहुन्नर व नितीन कोष्टी यांनी आपसात संगनमत करुन तक्रारदार ऐश्वर्या ढमाळ, मंदाकिनी काळभोर, वैभव काळभोर व सुवर्ण काळभोर यांना विश्वासात घेवून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. श्रीमंत बाजार कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादींनी 50 लाख 26 हजार रुपये गुंतवणुकीसाठी दिले. ठरलेल्या व्यवहारानुसार 100 दिवसानंतर 80 लाख 42 हजार रुपये परतावा आरोपींनी देणे अपेक्षित होते. परंतु कोणत्याही प्रकारे परतावा न देता फिर्यादींची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.








