ओडिशात एक्स्प्रेसची मालगाडीला धडक : आठ बोगी उलटल्या : 179 प्रवासी जखमी, मालगाडीचे इंजिनही घसरले
वृत्तसंस्था/ बालासोर
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. येथील बहनागा स्थानकाजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्स्प्रेस ऊळावरून घसरली. तसेच मालगाडीचे अनेक डबे एकमेकांवर चढले. इंजिनही रुळावरून घसरले असून मदत व बचावकार्य अंधारात सुरू होते. रात्री उशिरा ओडिशा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 50 जणांचा बळी गेला असून 179 लोक जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेनंतर बालासोर आणि आसपासच्या इतर जिह्यातील वैद्यकीय पथकेही मदतीसाठी रवाना झाली आहेत. रेल्वे ट्रॅकवर सिग्नल खराब झाल्याने दोन्ही गाड्या एकाच ऊळावर आदळल्या. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती सुरुवातीलाचा व्यक्त केली जात होती. रात्री आठ वाजेपर्यंत 150 हून अधिक प्रवाशांना नजिकच्या बहनगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी रेल्वेच्या उलटलेल्या डब्यात अनेक प्रवासी अडकल्याची बाब समोर आली. या दुर्घटनेनंतर सदर मार्गावरील सर्व वाहतूक थांबवण्यात आली.
अपघातग्रस्त एक्स्प्रेस हावडाहून चेन्नईला जात होती. दोन्ही गाड्या एकाच ऊळावर आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्नल नादुरुस्त झाल्यानंतर दोन्ही गाड्या एकाच ऊळावर आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नईतून ओडिशामार्गे पश्चिम बंगालमधील हावडापर्यंत धावते. ही टेन दुपारी 3.15 वाजता शालीमार स्टेशनवरून निघाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातानंतर शोक व्यक्त करतानाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी विशेष मदत सचिव सत्यब्रत साहू आणि महसूल मंत्री प्रमिला मलिक यांना अपघातस्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त करत आपद्ग्रस्तांना योग्य मदत पुरविण्याचे निर्देश आपल्या राज्यातील प्रशासनासह संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
सायंकाळी 7.20 च्या सुमारास अपघात
कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रल स्थानकाकडे जात असताना बहनगा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी 7.20 च्या सुमारास हा अपघात झाला. 132 जखमींना सोरो, गोपालपूर आणि खंतापाडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे, तर 47 जणांना बालासोर इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी सांगितले. तर, या दुर्घटनेत सुमारे 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती बालासोर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
अंधारामुळे बचावकार्यात अडचणी
ऊळावरून घसरलेल्या डब्याखाली अनेक लोक अडकले होते. स्थानिक लोक त्यांना वाचवण्यासाठी आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांना मदत करत होते. परंतु अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. ओडिशा आपत्ती निवारण जलद कृती दलाच्या (ओडीआरएएफ) चार तुकड्या, एनडीआरएफच्या तीन तुकड्या आणि 60 रुग्णवाहिका जखमींना वाचवण्यासाठी कार्यरत करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेल्पलाईन जारी
ओडिशा सरकारने हेल्पलाईन 06782-262286 जारी केली आहे. तर रेल्वे विमागाने 033-26382217 (हावडा), 8972073925 (खरगपूर), 8249591559 (बालासोर) आणि 044-25330952 (चेन्नई) या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. राज्यमंत्री मानस भुनिया आणि खासदार डोला सेन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी सांगितले.