भारतात होणाऱ्या स्पर्धेसंदर्भात मुंबईत झाला जागृती कार्यक्रम, ‘ट्रॉफी टूर’चाही प्रारंभ
वृत्तसंस्था/मुंबई
यंदाच्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी 50 दिवस शिल्लक असून त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेटमधील दिग्गज मिथाली राज आणि युवराज सिंग, सध्याच्या स्टार खेळाडू हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा सहभाग राहिला. 2016 मध्ये भारताने आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर आगामी 50 षटकांच्या विश्वचषकासह उपखंडात प्रथमच वरिष्ठ आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धा पुनरागमन करत आहे. भारताने यापूर्वी 1978, 1997 आणि 2013 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धा आयोजित केलेली आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांच्यासह भारतीय क्रिकेटच्या वर्तमान आणि भूतकाळातील स्टार खेळाडूंच्या मंडळाच्या चर्चेपूर्वी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
याप्रसंगी बोलताना शाह म्हणाले की, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा महिला क्रिकेटच्या दृष्टीने एका निर्णायक क्षणी भारतात पुनरागमन करत आहे. खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी वातावरण तयार होत आहे. ही स्पर्धा या खेळाचे जागतिक स्थान आणखी उंचावेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमातून आयसीसी चषकाच्या दौऱ्याची अधिकृत सुऊवात देखील झाली, मुंबईपासून हा दौरा सुरू झाला असून स्पर्धेच्या सर्व यजमान शहरांमध्ये हा चषक दाखल तसेच दिल्लीलाही भेट देईल. शालेय वारसा कार्यक्रमाचा व्यापक भाग म्हणून ‘ट्रॉफी टूर’ प्रत्येक यजमान शहरातील अनेक शाळांना भेट देईल. याअंतर्गत बीसीसीआय आणि आयसीसी संबंधित घटकांशी भागीदारी करून निवडक शाळांना विश्वचषकातील सामने पाहण्याची संधी देतील. ही स्पर्धा 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येईल, ज्यामध्ये भारताचा सलामीचा सामना श्रीलंकेविऊचा बेंगळूरमध्ये होईल.









