वाळवंटातील सफारीदरम्यान विदेशी युवतीवर जडलं प्रेम
प्रेमाला कुठलंच वय नसतं, कुठलीच सीमा नसते. हे दाखवून देणारे प्रकरण राजस्थानच्या जैसलमेर येथून समोर आले आहे. येथील एका 82 वर्षीय सुरक्षारक्षकाची प्रेयसी 50 वर्षांनी विदेशातून परतणार आहे. ऑस्ट्रेलियातून ही प्रेयसी केवळ या सुरक्षारक्षकाला भेटण्यासाठी येत आहे.
ह्युमन ऑफ बॉम्बेच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या अत्यंत रंजक कहाणीबद्दल माहिती देण्यात आली आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथील कुलधरा गावातील 82 वर्षीय सुरक्षारक्षकाची ही कहाणी आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियातील एक युवती राजस्थानात फिरण्यासाठी आली हाती आणि तिचे जैसलमेरच्या या व्यक्तीवर प्रेम जडले होते.

मरीनाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 30 वर्षांचा होतो. ती वाळवंटात सफारीसाठी आली होती. 5 दिवसांच्या या प्रवासात मी तिला उंटाची सवारी शिकविली होती आणि तेव्हाच आम्ही परस्परांच्या प्रेमात पडलो होतो असे या सुरक्षारक्षकाने सांगितले आहे. तिने कधीच लग्न केले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
5 दिवसांनी मरीना ऑस्ट्रेलियात परतली, काही काळानंतर मरीनाला भेटण्याठी 30 हजार रुपये उधारीवर घेत मेलबर्नला गेलो, पण विवाहानंतर ऑस्ट्रेलियातच स्थायिक होण्याची इच्छा मरीनाची होती, पण मी भारतात परतलो असे ते सांगतात.
राजस्थानात परतल्यावर काही काळानंतर त्यांनी अन्य युवतीशी विवाह केला आणि कुलधरामध्येच नोकरी केली. दोन वर्षांपूर्वीच या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले आहे. मुलांचे संसारही सुरू झाले आहेत. अचानक एक महिन्यापूर्वी मरीनाचे पत्र मिळाल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता मरीना परत भेटायला येत आहे. मला आता पुन्हा 21 वर्षांचा झाल्याचे वाटू लागले आहे. भविष्य काय आहे हे मला माहित नाही, पण माझं पहिलं प्रेम माझ्या जीवनात परतल्याचे त्यांचे सांगणे आहे.









