आयुष्मान-आरोग्य योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने अधिक गांभीर्य घेतले असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय तज्ञ सल्लागार समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिह्यातील आयुष्मान-आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत नोंदणीकृत खासगी हॉस्पिटलमधील शेकडा 50 टक्के बेड्स कोरोनाग्रस्तांसाठी राखीव ठेऊन ते जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करावेत, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिली आहे.
जिह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि खासगी हॉस्पिटल्स यामध्ये एकूण 3 हजार 935 बेड्स उपलब्ध आहेत. ही सर्व हॉस्पिटल्स आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत आहेत. त्यांना कोविड रुग्णांसाठी काही बेड राखीव ठेवावे लागणार आहेत. एकूण 2 हजार बेड्सची गरज आहे. मात्र, आतापर्यंत 641 बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे बेड्स कमी पडत आहेत.
सध्या रुग्णांची आकडेवारी पाहता तातडीने दोन हजार बेड्सची गरज आहे. तेव्हा संबंधित हॉस्पिटल्सनी जिल्हा प्रशासनाकडे बेड्स सुपूर्द करावेत, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर आणखी ऑक्सिजनची गरज लागणार आहे. त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पाठपुरावा करून ऑक्सिजन उपलब्ध करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली आहे.
बेळगाव जिह्याबरोबरच निपाणी व इतर ठिकाणी ऑक्सिजन उत्पादकांना भेटून त्याचा साठा उपलब्ध करावा. बळ्ळारी येथील बेल्डोटा कंपनीने आम्हाला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अडसर येणार नाही. तरीदेखील अधिकाऱयांनी गांभीर्य घेऊन काम करावे, असे त्यांनी सांगितले. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमध्ये सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंतच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये कालावधी वाढवून द्यावा, अशी जनतेची मागणी आहे, असे अधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले. यावर मनपा आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर एस., बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा नगर अभिवृद्धी कोशचे योजना निर्देशक ईश्वर उळागड्डी यांच्यासह इतर अधिकारी व सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.









