नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
2022 एएसबीसी आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या पुरुष व महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनने 50 जणांचा जंबो संघ घोषित केला आहे. सदर स्पर्धा जॉर्डनमध्ये 27 फेब्रुवारी ते 16 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेत युवा आणि कनिष्ठ गटातील पुरुष आणि महिला स्पर्धक दुसऱयांदा एकत्रित येणार आहेत. 2021 साली झालेल्या या स्पर्धेतील कांही पदकविजेत्यांचा यावेळी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये समावेश आहे. विविध वजन गटातील अंतिम लढतीना 2 मार्चपासून प्रारंभ होईल. 13 आणि 14 मार्च रोजी युवा आणि कनिष्ठ गटातील अंतिम लढती खेळविल्या जातील. भारतीय मुष्टीयुद्ध संघातील युवा विभागात 25 तर कनिष्ठ विभागात 25 स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारतीय मुष्टीयुद्ध युवा संघामध्ये विश्वनाथ सुरेश, वंशज, निवेदिता कर्की आणि तमन्ना यांचा समावेश असून या मुष्टीयुद्धय़ांनी 2021 साली झालेल्या या स्पर्धेमध्ये रौप्यपदकांची कमाई केली होती. भारतीय युवा संघामध्ये 13 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. कनिष्ठ गटामध्ये 13 मुले आणि 12 मुलींचा समावेश असून निकिता चंद नेतृत्व करीत आहे. दुबईमध्ये 2021 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने 14 सुवर्णपदकांसह एकूण 39 पदकांची कमाई केली होती.









