ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रार्दुभाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहीम मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. असे असले तरी अनेक राज्यातील शाळा अजूनही बंद आहेत. कोरोनामुळे शाळा सुरू करण्यावर मर्यादा येत असल्याने शिक्षकांचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला असून शिक्षक दिन म्हणजेच 5 सप्टेंबरपूर्वी शिक्षकांचे लसीकरण करावे अशा सूचना राज्यांना देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत ट्विट करत राज्यांना सूचना केल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, यापुढे प्रत्येक राज्याला लस उपलब्ध करून दिल्या जाणाऱया लशींची संख्या दोन कोटीने वाढविली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने 5 सप्टेंबर आधी सर्व शिक्षकांचे लसीकरण करण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा अजूनही बंद ठेवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.









