चोरीची मोटारसायकल घेऊन जाताना पोलिसांनी संशयावरून केली चौकशी
बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून 2 लाख 35 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हिरेबागेवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. संतोष शिवप्पा ऊर्फ शिवानंद बेविनकोप्प (वय 30) राहणार इंचल, ता. सौंदत्ती असे त्याचे नाव आहे. चोरीची मोटारसायकल घेऊन जाताना पोलिसांनी संशयावरून त्याची चौकशी केली असता त्याने पाच ठिकाणी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याजवळून मोटारसायकली जप्त केल्या.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेन्नावर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी. के. मिटगार, एम. आय. तुरमरी, प्रभाकर भुशी, वाय. एम. मुनवळ्ळी, प्रीतम कोचेरी, महांतेश हुगार, आर. एस. कळगीनमनी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. संतोष हा व्यवसायाने वाहनचालक आहे. त्याने बैलहोंगल तालुक्यातील नागनूर, नेसरगी, बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर व हुबळी येथे मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याजवळून केए 22 एचक्यू 8295 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर, नंबरप्लेट नसलेली हिरोहोंडा पॅशन प्रो, नंबरप्लेट नसलेली हिरो स्प्लेंडर प्लस, केए 25 ईक्यू 2786 क्रमांकाची हिरो आयस्मार्ट व केए 48 वाय 2792 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस अशा पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.









