इजिप्तमध्ये 5 हजार वर्षे जुने मद्य सापडले आहे. हा शोध एबिडोस शहरात इजिप्त, जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या एका पुरातत्व पथकाने लावला आहे. मद्याचा सीलबंद जार राणी मर्निथच्या थडग्यातून बाहेर काढण्यात आला आहे. वैज्ञानिकांनुसार एबिडोसमध्ये राणी मर्निथचा शाही मकबरा हा आतापर्यंत सापडलेला राजघराण्याचा एकमेव मकबरा आहे. पुरातत्व तज्ञांनी शोधलेल्या सीलबंद जारमध्ये सुमारे 5 हजार वर्षे मद्य सापडले आहे. या मद्याचे भांडे कधीच उघडण्यात आले नव्हते. प्राचीन मद्यासोबत पथकाला येथे अनेक फर्निचर्सही सापडली आहेत. त्यांचा वापर अंत्यसंस्कारासाठी केला जात असावा असे मानणे आहे. या शोधामुळे प्राचीन राणीचे जीवन आणि तिच्या शासनकाळाविषयी अधिक माहिती मिळणार आहे.

पथकाला एक प्राचीन दस्तऐवज देखील मिळाली असून यातून ती शासकीय कार्यालयांची प्रभारी होती असे समजते. राणीच्या थडग्यानजीक आणखी 41 थडगी असून ती तिच्या सल्लागारांची अन् कर्मचाऱ्यांची आहेत. राणी मर्निथ स्वत:च्या बळावर इजिप्तची शासक झाली असावी, असे पुरावे मिळाले आहेत. याचमुळे राणी मर्निथला पहिली महिला फिरौन मानले जात आहे.
राणीच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुरातत्व पथक सध्या काम करत आहे. या राणीने ख्रिस्तपूर्व 2950 सालापर्यंत शासन केले असावे असे मानले जात असले तरीही याचे पुरावे मिळालेले नाहीत.









