धीरज बरगे,कोल्हापूर
गोकुळ,एनडीडीबी आणि सिस्टीमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेला दूध उत्पादकांचा प्रतिसाद वाढत आहे.योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात 5 हजार बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट होते.सद्यस्थितीत गोकुळकडे साडेपाच हजारहून अधिक दूध उत्पादकांचे अर्ज आले आहेत.त्यामुळे पुढील काळात जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबे गॅस सिलेंडरमुक्त होणार आहेत.
दूध उत्पादक महिलांना धुर,धूळ विरहीत इंधन घरच्या घरी तयार करता यावे.शेण वाहून नेणे,शेणी लावणे या कामातून सुटका मिळावी व गॅस सिलेंडरच्या खर्चात बचत व्हावी,स्लरीच्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतीला मिळावे,या हेतूने कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना गोकुळकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये 2 घन मी.ते 5 घन मी.पर्यंत क्षमतेचे बायोगॅस उपलब्ध असणार आहेत.या बायोगॅसची देखभाल सिस्टीमा कंपनी 10 वर्ष पाहणार आहे.
दररोज 45 ते 65 किलो शेण आवश्यक
कार्बन क्रेडीट योजनेतंर्गत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी दररोज 45 ते 65 किलो शेण उपलब्ध होणे गरजेचे आहे. 2 घन मीटर बायोगॅससाठी 45 ते 50 किलो तर 2.5 घन मीटरच्या बायोगॅस प्रकल्पासाठी 60 ते 65 किलो शेण उपलब्ध होणे गरजेचे आहे.
सहा हजारमध्ये बायोगॅस प्रकल्प
दोन घनमीटरच्या बायोगॅस प्रकल्पची किमंत 41 हजार 260 रुपये असून गोकुळच्या दूध उत्पादक कुटुंबाला हा बायोगॅस प्रकल्प 5 हजार 990 इतक्या रक्कमेमध्ये मिळणार आहे. तर 2.5 घनमीटरच्या प्रकल्पची किमंत 49 हजार 500 रुपये इतकी असून हा प्रकल्प 10 हजार 490 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर डबल बर्नर गॅस शेगडीही लाभार्थ्यांना दिली जाणार आहे.
सर्व दूध उत्पादकांना मिळणार प्रकल्प
पहिल्या टप्प्यात पाच हजार प्रकल्प वितरीत करण्याचे उद्दीष्ट गोकुळचे होते. सद्यस्थितीत पाच हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पाच हजारच्या पुढील अर्जदारांना दुसऱ्या टप्प्यात बायोगॅस प्रकल्प दिला जाणार आहे. अर्ज केलेल्या सर्व उत्पादकांनी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास सर्वांना प्रकल्प देण्यासाठी गोकुळ प्रयत्नशील असणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी याबाबी आवश्यक
दूध उत्पादकांकडे 2 ते 3 जनावरे असावीत.
उत्पादकांनी दूध कायमस्वरूपी गोकुळच्या प्राथमिक दूध संस्थेकडे पुरविले पाहिजे.
प्रकल्पासाठी 12 फुट बाय 12 फुट इतकी जागा उपलब्ध करुन द्यावी.
बायोगॅस प्रकल्पाचे लवकरच वितरण
बायोगॅस प्रकल्पासाठी अर्ज केलेल्या दूध उत्पादकांनी 5 हजार 990 इतकी रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्यानंतर संबंधित उत्पादकांचे अर्ज मंजूरीसाठी पाठविण्यात येतील. हि प्रक्रीया सुरु असून मंजूरी मिळाल्यानतंर बायोगॅस प्रकल्पाचे लवकरच वितरण केले जाईल.
– विश्वास पाटील, चेअरमन गोकुळ दूध संघ.
बायोगॅस प्रकल्पासाठी आलेले तालुकानिहाय अर्ज
तालुका अर्जाची संख्या
करवीर 1185
आजरा 680
गडहिंग्लज 660
कागल 650
राधानगरी 600
भुदरगड 450
शाहूवाडी 350
पन्हाळा 300
चंदगड 194
शिरोळ 150
गगनबावडा 90
हातकणंगले 80
एकूण 5389









