कुलगाम येथे चकमक, दोन सैनिकही झाले जखमी
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम या सीमावर्ती भागात भारतीय सैनिकांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गुरुवारी पहाटे सैनिक आणि दहशतवादी यांच्यात ही चकमक झाली. दोन भारतीय सैनिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गुप्तचरांनी या दहशतवाद्यांच्या ठिकाणांची माहिती दिल्यानंतर सैनिकांनी धडक कारवाई करुन या दहशतवाद्यांना ठार केले. कुलगाम भागातील काद्देर आणि बेहीबाग या गावांमध्ये ही चकमक झाली. तिचा प्रारंभ मध्यरात्रीपासूनच झाला होता. या गावांमध्ये दहशतवादी लपले आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर सैनिकांच्या दोन तुकड्यांनी या स्थानांना घेरले आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला.
त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले. सैनिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाच दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी काही नागरिकांनाही ओलीस धरले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सैनिकांच्या दृष्टीला न पडण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी नागरी वस्त्यांच्या जवळ लपले होते. तरीही त्यांना शोधून काढण्यात आले आणि नागरिकांची जीवितहानी होऊ न देता हे अभियान पार पाडण्यात आले, अशी माहिती सेनेच्या प्रवक्त्याने नंतर दिली.
दहशवाद्यांची मालमत्ता जप्त
साधारणत: एक आठवड्यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत एका दहशतवाद्याचे घर आणि मालमत्ता जप्त केली आहे. याच घरात वास्तव्यास असणाऱ्या 4 दहशतवाद्यांना 4 जुलैला ठार करण्यात आले होते. ही मालमत्ता मुश्ताक अहमद भट या व्यक्तीच्या नावावर नोंद होती. भट याने चार दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने मालमत्ता जप्त करण्यात आली.
जिल्ह्यात दहशतवादविरोधी अभियान
कुलगाम जिल्ह्यात भारतीय सेनेने स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने दहशतवादविरोधी अभियान हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्याच्या वनविभागात आणि सीमावर्ती भागात शोध घेण्यात येत आहे. पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांचे हे नेहमीचे ठिकाण आहे. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत 20 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हा जिल्हा दहशतवादमुक्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सेनेने येथे सैनिकांच्या तुकड्यांमध्ये वाढही केली आहे.









