तिन्ही शूटर्सना 4 दिवसांची पोलीस कोठडी
वृत्तसंस्था/ प्रयागराज
अतिक-अशरफ हत्याकांडप्रकरणी बुधवारी प्रयागराजच्या शाहगंज पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. एसआयटीच्या चौकशीअंती पोलीस विभागाने तीन दिवसांनंतर ही कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये एसओ अश्वनी कुमार सिंग यांच्यासह दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे. दुसरीकडे, लवलेश, सनी आणि अरुण या तिन्ही आरोपी नेमबाजांना प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सीजेएम कोर्ट क्रमांक 10 मध्ये न्यायाधीश दिनेश कुमार गौतम यांनी रिमांडचा आदेश दिला.
अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येतील मुख्य हल्लेखोरांची गुन्हे शाखेचे उपायुक्त सतीश चंद्र, एसीपी सत्येंद्र तिवारी आणि निरीक्षक ओम प्रकाश यांच्याकडून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी त्यांच्यासाठी 100 प्रश्न तयार केल्याचे बोलले जात आहे. या आरोपींच्या मोबाईलचाही पोलीस शोध घेत आहेत. मोबाईलची तपासणी करून ते शेवटच्या क्षणी कोणाच्या संपर्कात होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
असद कालिया अटकेत
दुसरीकडे, बुधवारी प्रयागराज पोलिसांनी अतिक अहमद टोळीचा शूटर असद कालिया याला अटक केली. त्याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. असद कालिया हा अतिक टोळीचा फायनान्सर असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आता त्याची चौकशी करत आहेत.
न्यायालय आवारात कडेकोट बंदोबस्त
तिन्ही हल्लेखोरांना बुधवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले. तीन हल्लेखोरांना 17 एप्रिल रोजी प्रयागराज कारागृहातून प्रतापगड तुरुगात हलवण्यात आले होते. तीन हल्लेखोरांना सुरुवातीला प्रयागराजच्या नैनी तुरुगात ठेवण्यात आले होते, परंतु अतिकचा मुलगा अली हा देखील नैनी तुरुगात असल्यामुळे टोळीयुद्धाच्या भीतीने तिन्ही हल्लेखोरांना प्रतापगड जिल्हा कारागृहात हलवण्यात आले.









