वर्षअखेरपर्यंत 7 टक्के घट शक्य : 55 इंचाचे स्मार्ट टीव्ही मागणीत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कॅलेंडर वर्ष 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतात करण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीच्या शिपमेंटमध्ये 5 टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. एकंदर वर्षा अखेर पाहिल्यास स्मार्ट टीव्हीची शिपमेंट ही 7 टक्के इतकी कमीच राहू शकते, असा अंदाज काउंटर पॉईंट रिसर्च या संस्थेने वर्तवला आहे. पहिल्या सहा महिन्यांमध्ये पाहता स्मार्ट टीव्हीची शिपमेंट भारतामध्ये 5 टक्के कमी झाली आहे. भारतामध्ये टीव्ही निर्मितीत वाढ होत असून मागणीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. अलीकडच्या काही महिन्यात महागाई व इतर कारणामुळे स्मार्ट टीव्हीच्या मागणीवर परिणाम झाला आहे. दुसऱ्या सहामाहीत विविध उत्सव, सण साजरे केले जाणार असून या काळामध्ये स्मार्ट टीव्हीची मागणी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या अनुषंगाने पाहता टीव्ही शिपमेंटमध्येसुद्धा वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे ट्रेंड
स्मार्ट टीव्ही बाजारातील एकंदर ग्राहकांचा खरेदीचा कल पाहता मोठ्या क्रीनच्या टीव्हीला मागणी वाढीव राहिली आहे. यामध्ये 55 इंचाचा टीव्ही अधिक लोकप्रिय ठरतो आहे. 55 इंचापेक्षा जास्त आकाराच्या स्मार्ट टीव्हीची शिपमेंट जवळपास वर्षाच्या आधारावर 18 टक्के इतकी वाढली आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही स्मार्ट टीव्ही डॉल्बी ऑडिओ सराऊंड साऊंडसह घेण्याची क्रेझ ग्राहकांमध्ये दिसते आहे.









