जत, प्रतिनिधी
विजापूर गुहागर मार्गावर जत पासून पाच किलोमीटर अंतरावरील अमृतवाडी फाट्याजवळ शुक्रवार रात्री झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यात एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे.बौद्ध पौर्णिमेनिमित्त गाणगापूर येथून देवदर्शन करून जतकडे येत असताना शहराजवळच ट्रक आणि स्विफ्ट यांच्यात ही भीषण धडक झाली. तालुक्यातील बनाळी येथील सावंत कुटुंबियातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील बनाळी येथील नामदेव पुनाप्पा सावंत (वय 65),पद्मिनी नामदेव सावंत (वय- 60), मयुरी आकाशदीप सावंत (वय- 38), श्लोक आकाशदीप सावंत (वय -8) , व गाडी चालक दत्ता हरिबा चव्हाण हे शुक्रवारी गाणगापूर येथे दत्त दर्शनासाठी गेले होते.दर्शन करून रात्री साडे दहाच्या सुमारात जतकडे परत येत असताना विजापूर गुहागर मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्वीफ्ट चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट ट्रकला जाऊन धडकली.या धडकेत कार तब्बल 100 फूट फरपटत गेल्याने स्विफ्ट मधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच चालक दत्ता चव्हाण यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.याच अपघातात सावंत कुटुंबियातील वरद आकाशदीप सावंत हा 10 वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे.परंतु त्यालाही गंभीर मार लागल्याने सांगली येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामागरे यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.अलीकडच्या पंधरा वर्षातील सर्वात भीषण हा अपघात आहे.सावंत कुटुंबियातील चौघांचा मृत्यू झाल्याने बनाळी व परिसरात मोठी शोक काळा पसरली आहे.
Previous Articleअक्कळवाडी येथे पालखी मिरवणूक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी
Next Article Ratnagiri:वीज वाहिनीच्या धक्क्याने तरूणांचा मृत्यू









