धावत्या गाडीत गोळी घालून झाली होती हत्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2008 मध्ये झालेल्या सौम्या विश्वनाथनच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने बुधवारी 5 जणांना दोषी ठरविले आहे. 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे सुमारे 3.30 वाजता सौम्याची धावत्या गाडीत गोळी घालून हत्या करण्यात आली होती. रवि कपूर, बलजीत मलिक, अमित मलिक आणि अमित शुक्ला हे सौम्याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरले आहेत. तर अमित सेठी याला मकोका अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे.
सौम्या ही स्वत:च्या कारमधून घराच्या दिशेने जात असताता तिची हत्या करण्यात आली होती. हत्येमागील उद्देश लूट करण्याचा होता. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हे नोंदविले होते. बलजीत मलिक, रवि कपूर आणि अमित शुक्ला यांना यापूर्वी 2009 मध्ये आयटी तंत्रज्ञ जिगिशा घोषच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. हे तिन्ही गुन्हेगार जिगिशाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. जिगिशाच्या हत्येत वापरण्यात आलेले शस्त्रास्त्र हस्तगत झाल्यावर सौम्या विश्वनाथनच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सौम्या विश्वनाथनच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या गुन्हेगारांच्या शिक्षेसंबंधी 26 ऑक्टोबर रोजी युक्तिवाद केले जाणार आहेत. त्यानंतर पुढील तारखेला हत्येप्रकरणी शिक्षा सुनावली जाऊ शकते. यापूर्वी साकेत न्यायालयाने बचाव अन् सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर 13 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी स्वत:चा निर्णय राखून ठेवला होता.









