‘एस-400’ हवाई संरक्षण प्रणाली किंगमेकर : वायुदल प्रमुखांची माहिती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
पहलगाम हल्ल्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडण्यात आल्याची स्पष्ट माहिती वायुदल प्रमुख ए. पी. सिंग यांनी शनिवारी दिली. याशिवाय सुमारे 300 किलोमीटर अंतरावरून पाळत ठेवणारे एक विमानही उद्ध्वस्त करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आले. आतापर्यंत जमिनीवरून हवेत अचूकपणे लक्ष्य टिपण्याचा हा विक्रम असल्याचे एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बेंगळूर येथील कार्यक्रमात स्पष्ट केले. एचएएल मॅनेजमेंट अकादमी सभागृहात एअर चीफ मार्शल एल. एम. कात्रे मेमोरियल लेक्चरच्या 16 व्या सत्रात ते भाषण करत होते.
भारतीय वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले कारण सशस्त्र दलांवर कोणतेही निर्बंध नव्हते. राजकीय इच्छाशक्ती, स्पष्ट सूचना आणि कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांच्या अभावामुळे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले. आम्हाला किती पुढे जायचे आहे हे आम्ही स्वत: ठरवले. तिन्ही दलांमध्ये चांगला समन्वय होता. त्यामुळेच हे यश मिळाले असून ए-400 संरक्षण प्रणालीने उत्कृष्ट कामगिरी बजावत ‘किंगमेकर’ होण्याचा मान पटकावला, असे सिंग यांनी जाहीर केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ए-400 हवाई संरक्षण प्रणालीने 5 पाकिस्तानी लढाऊ विमाने हवेत पाडली. सुमारे 300 किलोमीटर अंतरावरून पाळत ठेवणारे एक विमान देखील पाडण्यात आले. हे एक विशेष प्रकारचे विमान असून ते हवेत देखरेख आणि इशारा देण्यासाठी वापरले जाते. जकोकाबाद हवाई तळावर पार्क केलेल्या काही एफ-16 विमानांना देखील लक्ष्य करण्यात आल्याचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी सांगितले.
90 तासांच्या युद्धानंतर पाकिस्तान बॅकफूटवर
पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक हायटेक युद्ध होते. 80 ते 90 तासांच्या युद्धात आम्ही इतके नुकसान करू शकलो की त्यांना (पाकिस्तानला) स्पष्टपणे माहित होते की जर त्यांनी हे चालू ठेवले तर त्यांना त्याची आणखी मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळेच त्यांनी पुढे येऊन आमच्या डीजीएमओला संदेश पाठवला की त्यांना चर्चा करायची आहे. आमच्याकडून डीजीएमओ प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर संघर्ष तूर्तास थांबण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वायुदल प्रमुखांनी स्पष्ट केले.
भारतीय वायुदल प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की आपण सतत युद्धात राहू शकत नाही. युद्ध सुरू न ठेवण्याचा निर्णय उच्च पातळीवर घेण्यात आला होता आणि आम्ही त्याचा एक भाग होतो. लोक अनेकदा युद्धात आपला अहंकार पुढे ठेवतात. परंतु जेव्हा आपण ध्येये साध्य केली तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे युद्ध थांबवणे आवश्यक आहे. जरी काही लोक लढाई सुरू ठेवण्याबद्दल बोलत असले तरी उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर सौम्य धोरण स्वीकारणेच रास्त असते, असे ते म्हणाले.
अचूक निरीक्षण, बिनचूक लक्ष्य
पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानमधील दहशतवादी अ•dयांवर केलेल्या कारवाईचे पुरावे एअर चीफ मार्शल सिंग यांनीही सादर केले. सर्व लक्ष्ये आधीच निश्चित करण्यात आली होती. दहशतवादी तळ अचूकपणे ओळखून बिनचूकपणे लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यापूर्वी आणि नंतर उपग्रह प्रतिमांच्या आधारे नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले. या मोहिमेतील आंतर-सेवा समन्वय आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणालींमुळे ही कारवाई यशस्वी झाली आणि शत्रूचे मोठे नुकसान झाले, असेही वायुदल प्रमुखांनी स्पष्ट केले.
भारताने 7 मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अ•s उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या हवाई संरक्षणामुळे शेजारी देशाला पराभव स्वीकारावा लागला. बॅकफूटवर दिसणारे पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर भारताने ते मान्य केले. अशाप्रकारे, 10 मे रोजी दोन्ही बाजूंनी युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला. तथापि, भारताने स्पष्टपणे सांगितले की ऑपरेशन सिंदूर संपवले नसून ते पुढे ढकलण्यात आले आहे.









